उपरी हायस्कूल मध्ये 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा सत्कार
पंढरपूर प्रतिनिधी--
आजच्या विज्ञान व संगणकीय युगामध्ये भावी पिढीवर चांगले व उत्तम संस्कार करावयाचे असेल तर प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठांचा सन्मान करणे ही आजच्या काळाची गरज बनली असून यामुळे प्रत्येक घरा घरात संस्कार टिकून राहतील असे पंढरपूर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक संजय फुगारे यांनी सांगितले.उपरी ता.पंढरपूर येथील मा.विलासराव देशमुख हायस्कूलमध्ये जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने गावातील 75 वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी नायब तहसीलदार महादेव नागणे, माजी सरपंच शिवाजी नागणे,कृष्णा नागणे लक्ष्मण गव्हाणे,माजी चेअरमन बाळासाहेब नागणे,गुलाब मुलाणी, रामचंद्र नागणे,शिवाजी खाडे,गोवर्धन नागणे,शिवाजी कोळी,धर्मा नागणे,सेवा निवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर नागणे,मुख्याध्यापक बिभीषण कलागते,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख नागणे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी पुढे बोलतांना फुगारे म्हणाले की,असा सत्कार हा मी पहिल्यांदाच पाहत आहे,असे कार्यक्रम सर्वत्र झाले तर आपोआपच आपली संस्कृती व वारसा जपला जाईल व नाते संबंध अधिक दृढ होतील,आज ज्येष्ठांचे मार्गदर्शन ज्या ज्या घरांमध्ये आहे ती घरे यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत असे फुगारे यांनी सांगितले. याप्रसंगी मा. नायब तहसीलदार महादेव नागणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक बिभीषण कलागते यांनी विनाअनुदान काळात आम्हाला या ज्येष्ठांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळले आहे त्यामुळे आम्हाला कधीही पगार नसल्याची जाणीव झाली नाही यामुळे आमचे कर्तव्य व नवीन पिढीला एक चांगली दिशा मिळावी म्हणून आम्ही आज प्रशालेच्या वतीने या सर्व ज्येष्ठांचा सत्कार केला आहे असे सांगितले.
या प्रसंगी शिक्षक दिलीप जगताप,विलास राऊत नागनाथ महाडिक,एस.आर. नागणे, लक्ष्मण कुंभार, प्रवीण नागणे, लिपिक बी.एस. शेवाळे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह गावातील सर्व समाजातील 75 वर्ष पूर्ण केलेले जेष्ठ नागरिक,विद्यार्थी उपस्थित होते.
चौकट ---- भावनिक क्षणाचे आम्ही साक्षीदार
आमच्या आयुष्यातील हा पहिलाच सार्वजनिक सत्कार आहे,नव्या पिढीने जुन्या पिढीचा मानसन्मान राखणे ही गोष्ट कौतुकास्पद असल्याचे सांगत काही ज्येष्ठ अक्षरशा याप्रसंगी भावुक झाल्याचे पहावयास मिळाले.
घरी जाईपर्यंत डोक्यावर ठेवले फेटे
कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना फेटे बांधण्यात आले होते यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले त्यामुळे कार्यक्रम संपेपर्यंत नव्हे तर अनेकांनी घरी जाईपर्यंत आपल्या डोक्यावर फेटे तसेच ठेवले तर काहींनी आवर्जून फोटोही काढल्याचे याप्रसंगी पहावयास मिळाले.
Tags
सामाजिक वार्ता