पुरातन विभागाचे अधिकारी आज सायंकाळी करणार पाहणी
पंढरपूर प्रतिनीधी--
विठ्ठल रुक्मिणी मंदिर पुरातन असल्याने याचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. विठ्ठल मंदिरातील हनुमान दरवाजा येथील फरशी काढत असताना खाली तळघर असल्याचे आढळून आले. याची पाहणी पुरातन विभागाचे अधिकारी आज सायंकाळी करणार आहेत.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राचीन असल्याने याचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीमधून संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले असून त्यास प्राचीन लूक देण्यात आला आहे. विठ्ठल मंदिरात काम सुरू असल्याने पहाटे पाच ते सकाळी ११ पर्यंत भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शन देण्यात येत आहे. यानंतर कामासाठी मंदिर बंद करण्यात येत आहे. दोन जून पासून विठ्ठलाचे पद दर्शन सुरू करण्यात येणार आहे.
विठ्ठल मंदिरातील हनुमान दरवाजा येथील फरशी काढत असताना अचानक एक फरशी खाली गेली. यामुळे कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता खाली तळघर असल्याचे दिसून आले. फराशी काढण्याचे काम त्वरित धांबविण्यात आले असून याची माहिती पुरातन विभागाला देण्यात आली आहे. पुरातन विभागाचे संचालक विलास वाहने व आफळे मॅडम सायंकाळी पंढरपुरात विठ्ठल मंदिरात येऊन पाहणी करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
विठ्ठल मंदिरात तळघर सापडले असल्याने याबाबत चर्चा रंगू लागली आहे. हे तळघर किती वर्ष जुने आहे व किती लांब व रुंद आहे, सकाळी याची माहिती पुरातन विभागाने पाहणी केल्यानंतर उघड
होणार आहे. तर तळघरात कोण कोणत्या वस्तू आहेत, याची उत्सुकता नागरिक व भाविकांना लागली आहे.
Tags
सामाजिक वार्ता