श्री पांडुरंगराय पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान

पंढरपूर प्रतिनिधी--
टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत श्री संत मुक्ताबाईंच्या ७२७  व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री पांडुरंगराय  पादुका पालखी सोहळ्याने आज ( शुक्रवार ) दि. ३१  मे रोजी सकाळी ७ वाजता श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवले. पहिल्या मुक्कामासाठी सायंकाळी हा सोहळा औरंगाबाद मुक्कामी विसावला.
 शुक्रवारी सकाळी ६ वाजता  श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या विश्वस्त शकुंतला नडगीरे  यांच्या हस्ते श्री विठ्ठल पादुकांची विधीवत प्रस्थान पूजा करण्यात आली. आरतीनंतर श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी श्री पंढरीनाथ परमात्मा पांडुरंग यांच्या पादुकांचे मुक्ताईनगर कडे प्रस्थान झाले . 
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर , कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान सोहळ्याचे पौरोहित्य संदीप कुलकर्णी व मेघराज वळखे पाटील यांनी केले . यावेळी सहाय्यक विभाग प्रमुख अतुल बक्षी , श्री संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष  रवींद्र  पाटील , संग्राम पाटील ,  मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवींद्र महाराज हरणे,  भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  सूर्यकांत भिसे आदी उपस्थित  होते.
पांडुरंगाच्या पादुका विठ्ठल मंदिरातून मुख्य मंडपात आणण्यात आल्या. विश्वस्थ शकुंतला नडगीरे यांनी या पादुका ॲड . रविंद्र पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्या. या पादुका सभामंडपात ठेवण्यात आलेल्या पालखीमध्ये ठेवल्या. त्यानंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व हा सोहळा करमाळ्याकडे मार्गस्थ झाला.

करमाळ्यात भव्य स्वागत
सकाळी १० वाजता पालखी सोहळा करमाळा येथे पोहोचला. येथे दत्त मंदिरात पालखी सोहळ्याचे स्वागत प्रवीण  कटारिया, सुधीर कटारिया , सचिन कटारिया ,   संजय  भालेराव,  सत्यभामा  बनसुडे,   संजय शिंदे आदिंनी केले.   वारकर्‍यांनी येथे सकाळची न्याहरी केली व सकाळी ११  वाजता हा सोहळा नगरकडे मार्गस्थ झाला.
नगरमध्ये उत्साही स्वागत 
श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा नगर येथील दिल्ली गेटजवळ पोहोचल्यानंतर मोठ्या उत्साहात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. तेथून भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी हा सोहळा नगर येथील श्री सिद्धेश्‍वर महादेव मंदिरात पोहोचला. येथे सिद्धेश्‍वर महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष  दिलीप  पांढरे,  धनंजय  जाधव,  राजेंद्र जाधव,  राहुल  पांढरे,  शिवदत्त  पांढरे व  असंख्य विठ्ठल भक्तांनी सोहळ्याचे स्वागत केले. येथे दुपारचा नैवेद्य व वारकर्यांना भोजन देण्यात आले. विश्रांतीनंतर सोहळा नेवासाफाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे  मार्गस्थ झाला.
सायंकाळी श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आगमन झाल्यानंतर सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. गारखेडा येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या संत गजानन महाराज मंदिरात पालखी सोहळा पोहोचल्यानंतर संस्थानसह भाविकांनी सोहळ्याचे स्वागत केले. समाज आरतीनंतर वारकर्‍यांना अन्नदान करण्यात आले. रात्रौ किर्तनाची सेवा झाल्यानंतर सोहळा येथे विसावला.
उद्या शनिवार  दि. १ जून  रोजी सिल्लोड, जामनेरमार्गे हा सोहळा भुसावळ मुक्कामी पोहोचेल. येथे श्री पांडुरंग, संत नामदेव महाराज व संत निवृत्तीनाथांच्या भेटीचा सोहळा होईल. पालखी सोहळ्यामध्ये १०० वारकरी सहभागी झाले आहेत.

चौकट ः
श्री संत मुक्ताबाईंचा बुधवार दि.  २ जून  रोजी ७२७ वा अंतर्धान समाधी सोहळा आहे. या समाधी सोहळ्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग, संत निवृत्तीनाथ, संत नामदेव आदि संत उपस्थित होते असे अभंगात वर्णन केले आहे. याप्रमाणे संत नामदेवांच्या पादुका घेवून नामदेव महाराजांचे वंशज गेली शेकडो वर्षे या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प.गुरूवर्य केशवदास नामदास महाराज पंढरपूर यांचे येथे समाधी सोहळ्याचे किर्तनही येथे होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form