ज्येष्ठ गायक पंडित अजित कडकडे यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा
पंढरपूर प्रतिनिधी--
सोलापुर येथील प्रख्यात शिवरंजनी वाद्यवृंदाचा दरवर्षी साजरा होणारा “कलागौरव पुरस्कार” सोहळा येत्या सोमवारी म्हणजे दिनांक ६ नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित केला असून ज्येष्ठ गायक पंडित अजित कडकडे हे पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत, अशी माहिती शिवरंजनीचे निर्माता समीर रणदिवे आणि दिग्दर्शक उन्मेष शहाणे यांनी दिली.
सोमवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता आयोजित शिवरंजनी पुरस्कार सोहळ्याविषयी अधिक माहिती देताना रणदिवे - जैन पुढे म्हणाले की, “या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी गायक वा वादक कलाकाराला “शिवरंजनी कलागौरव पुरस्कार” देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी या पुरस्कारासाठी पंढरपूर येथील संगीतकार व गायक विनोद शेंडगे यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच संगीत सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलेल्या व्यक्तीला “शिवरंजनी संगीत सेवा सन्मान पुरस्कार” देऊन गौरविले जाते. यावर्षी हा संगीत सेवा सन्मान सोलापुरातील बालगंधर्वांचे सच्चे भक्त कै. एस एम पाटील यांच्या परिवारास हा पुरस्कार दिला जाणार आहे. एस एम पाटील परिवाराच्यावतीने ॲड. रेवणसिध्द पाटील हे पुरस्कार स्वीकारतील. हे दोन्ही पुरस्कार पंडित अजित कडकडे यांच्या हस्ते दिले जातील.
हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी निःशुल्क आहे. याच्या मोफत प्रवेशिका एस के कॉम्प्युटर, दत्ता चौक आणि प्रिती डायनिंग हॉल, दंडवते महाराज मठाजवळ, एम्प्लॉयमेंट चौकाजवळ, सोलापूर येथे उपलब्ध आहेत, अशी माहिती समीर जैन - रणदिवे यांनी दिली.
Tags
संगीत वार्ता