मुंबईतील दोन व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
पंढरपूर (प्रतिनिधी)---
भंडीशेगाव येथील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची मुंबई येथील दोन व्यापाऱ्यांनी ५५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
संभाजी आसबे यांची भडीशेगाव येथे पंचवीस एकर बागायत शेती आहे.
मुंबई येथील दोन व्यापाऱ्यांनी आसबे यांच्याकडून ६९ लाख रुपयांची द्राक्षे परदेशात निर्यात करण्यासाठी नेली होती.
यापैकी केवळ १५ लाख रुपये त्यांनी द्राक्ष बागायतदार आसबे यांना दिले होते. मात्र उर्वरित रक्कम देण्यासाठी हे व्यापारी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे संभाजी आसबे यांना आपली फसवणूक झाली असल्याची खात्री झाली.
आपली उर्वरित रक्कम परत मिळावी यासाठी आसबे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित दोन मुंबईच्या व्यापाऱ्यावर फिर्याद दाखल केली असून आपले पैसे परत मिळावेत यासाठी मागणी केली आहे.मुंबई येथील नारायण ठोसर आणि गणेश ठोसर यांनी द्राक्ष बागायतदार संभाजी आसबे यांच्याकडून एप्रिल २०२२ मध्ये, तुमची द्राक्षे उत्तम प्रतीची असून परदेशात निर्यात करून तुम्हाला चांगला दर मिळवून देतो, असे खोटे आश्वासन देऊन तब्बल ६९ लाख रुपये देतो असे बोलून द्राक्षे मुंबई येथे घेऊन गेले. आणि केवळ १५ लाख रुपयांची बोळवण केली.
अशाच पद्धतीने या व्यापाऱ्यांनी सांगोला.पंढरपूर, तासगाव तालुक्यातील काही शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक केली आहे.गादेगाव येथील चंद्रकांत बागल यांच्याकडून चौदा लाख रुपयांची द्राक्षे नेऊन केवळ ७ लाख रुपये त्यांना दिले आहेत.
शेतमालाला परराज्यात व परदेशात चांगली रक्कम मिळत असल्याने अनेक शेतकरी अशा व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवून जीवापाड जपलेले पीक देतात,पण टक्केवारी ला सोकावलेले असे बोके शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत.
Tags
क्राईम न्यूज