दिव्यांग भगिनींना साडीचोळी वाटप ... अधिक महिन्यानिमित्त समाजसेवक हनुमंत मोरे यांचा उपक्रम

पंढरपूर (प्रतिनिधी 
अधिक मासात अनेक पुण्यकर्मे करण्याचा रिवाज आहे. यानिमित्ताने कुणी देवदर्शन, अन्नदान यांसारखे उपक्रम राबवताना आढळतात. परंतु समाजसेवक हनुमंत मोरे यांनी समाज भगिनींना साडीचोळी वाटप करण्याचा रिवाज मांडला आहे. समाजातील दिव्यांग भगिनींना साडी चोळी वाटप करून त्यांनी, या घटकास उपकृत केले आहे.

हनुमंत मोरे हे पंढरपूर तालुक्यातील भोसे गावचे रहिवासी असून, त्यांची समाजसेवक म्हणून ओळख आहे. दुष्काळ असो की कोरोना काळ, समाजातील घटकांना त्यांची नेहमीच मदत राहिली आहे. दुष्काळात दलित बांधवांच्या वस्तीला स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याचे काम त्यांनी केले होते. या कामाची दखल संपूर्ण तालुक्याने घेतली होती. कोरोना काळात कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे याशिवाय बेड मिळवून देणे अशी अनेक कामे त्यांनी केली होती.  समाजातील गरजवंतांना मदत करण्याची त्यांची सवयच त्यांना कधी समाजसेवक बनवून गेली हे त्यांनाही कळले नसेल.

सध्या अधिक मास सुरू आहे. पंढरपूर तालुक्यात या महिन्यास अधिक महत्त्व आहे. संपूर्ण जगाचा उद्घाता भगवान पांडुरंग पंढरपूरमध्ये असल्याने, अधिक मासाचे महत्त्व या तालुक्यात अधिक आहे. म्हणूनच श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक पंढरीत येत असतात. या मासात काहीतरी पुण्य कर्म करण्याची धडपड प्रत्येक जण करत असतो. समाजसेवक हनुमंत मोरे यांनी येथील दिव्यांग भगिनींना साडी चोळीचे वाटप करून, त्यांचा दुवा घेतला आहे. देव देवळात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form