श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पंढरपूर येथे ऊस पिक परिसंवाद २०२३ संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी --
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.अभिजीत धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचे वतीने सदगुरु मंगल कार्यालय, वाखरी, ता. पंढरपूर येथे आज रविवार दि. २३.०७.२०२३ रोजी पहिल्या सत्रामध्ये कृषीरत्न मा.डॉ. संजीवदादा माने ऊस तज्ञ कृषिभूषण व मा. भागवत सरडे तालुका कृषि अधिकारी, मंगळवेढा व मा. सुर्यकांत मोरे, तालुका कृषि अधिकारी, पंढरपूर यांचे उपस्थितीत ऊस पिक परिसंवाद २०२३ संपन्न झाला. याप्रसंगी श्री विठ्ठल प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या शुभहस्ते करून कार्यक्रमास सुरूवात झाली. तसेच दुसन्या सत्रामध्ये पंजाबराव डख, हवामान अभ्यासक यांचे हवामान आधारित ऊस शेती यावर व्याख्यान पार पडले.
या प्रसंगी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सध्याच्या बदलत्या हवामानाचा अंदाज सांगितला. पुर्वी आपल्याकडे पाऊस कमी पडत होता व मुंबईसह कोकणामध्ये जादा पाऊस पडत होता. २५ जुलै नंतर चक्रीवादळ निर्माण होवून त्याचा आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्यास फायदा होणार असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी असणारे उजनी धरण भरेल असाही त्यांनी अंदाज व्यक्त केला. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देऊन कोणत्या वेळी किती पाऊस पडेल याचा अंदाज सांगितले.
जागतिक तापमान वाढीमुळे भविष्यात निसर्गात मोठे बदल होणार आहेत. भविष्यात कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे. मान्सून वेळेत आला होता परंतु अडथळ्यांमुळे तो लांबला. पुढील तीन महिने राज्यात पाऊस जोर धरणार आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस झाला असून २५ जुलैपासून दमदार पावसाला सुरुवात होणार, अशी माहिती हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिली.
जागतिक तापमान वाढ थांबविण्यासाठी झाडे लावणे गरजेचे
हवामान बदलाने निसर्गचक्रात मोठे बदल होत आहेत. उन्हाळ्यात जास्त तापमान, थंडीत जास्त थंडी तर पावसाळ्यात कमी वेळेत जास्त पर्जन्यमान वाढत आहे. जागतिक तापमान वाढ थांबविण्यासाठी झाडे लावून वाढविणे गरजेचे आहे. चर पाडून पाणी जमिनीत मुरविल्याने जमिनीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याचेही पंजाबराव डख यांनी यावेळी सांगितले.