*मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारची वर्षपूर्ती...*
थेट जनतेत जाऊन काम करण्याच्या आपल्या वेगळ्या कार्यशैलीने मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा नायक ठरले आहेत
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले,यास आज एक वर्ष पूर्ण होत आहे.
या एक वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त वेळ महाराष्ट्राच्या जनतेला देत राज्याचा चौफेर विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.शिंदे साहेबांबरोबर शिवसेना पक्षात सक्रिय होत प्रवक्ते पदाची जबाबदारी घेतल्यानंतर या सरकारचा प्रवास एक कार्यकर्ता म्हणून अतिशय जवळून पाहता व अनुभवता आला.
राज्यातील पायाभूत सुविधा असो,बेरोजगार,विद्यार्थी,शेतकरी,कष्टकरी,कामगार वर्ग,महिला,ज्येष्ठ नागरिक यांसह उद्योग,शिक्षण,आरोग्य,पर्यावरण,शेती,रस्ते विकास अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वच बाबतीत धडाकेबाज निर्णय घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व सामान्य कुटुंबातील एखादा कार्यकर्ता मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचल्यानंतर सर्वसामान्यांचे हित जोपासत राज्यकारभार कसा केला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
एकीकडे ज्यांना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राजकीय उठावामुळे सत्तेतून पायउतार व्हावे लागले ते लोक गेली वर्षभर सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडत अतिशय खालच्या पातळीवर,शिवराळ भाषेत सातत्याने उपहास,टीका टिप्पणी करीत असताना दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र कृतीवर भर देत संयमाने आपल्याला मिळालेल्या या संधीचं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घटकांसाठी सोनं करण्याचा विडा उचलल्याप्रमाणे रात्रंदिवस काम केले आहे.वाचाळपणा,वायफळ बडबडीपेक्षा प्रत्यक्ष कार्यातून त्यांनी स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे.व्यापक जनाधार असलेलं लोकाभिमुख नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदेची जनमाणसात आज प्रतिमा आहे.
"तुम्ही आरोप करा आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ" हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला मंत्र आज त्यांच्याबरोबर काम करणारे आमच्यासारखे असंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते अंगीकारण्याचा प्रयत्न करीत आहेत.यातून राजकारणात सक्रिय नवीन पिढीला योग्य दिशा आणि सकारात्मक संदेश मिळत आहे.
भगवान पांडुरंगाचीच कृपा म्हणून की काय आषाढी एकादशीच्या पावन दिनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.आषाढी वारीच्या सोहळ्यातही पांडुरंगाचा एकनाथ शिंदे नावाचा हा वारकरी जमिनीवर पाय ठेवून असल्याचे पहायला मिळाले.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अनेक मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीला मिळणारा विठ्ठल-रखुमाईच्या पूजेचा मान दिमाखात मिरवला.मात्र एकनाथ शिंदे त्यास अपवाद ठरले.जनतेच्या या सेवेकऱ्याने पूजेचा मान घेण्यापूर्वीच पांडुरंगाच्या चरणी अचानक पंढरपूरला हजेरी लावत लाखो वारकरी भक्तांच्या सेवा सुविधांचा आढावा घेतला.पांडुरंगाच्या दारातली स्वच्छता,नीटनेटकेपणा, आरोग्य व पर्यावरण पूरक बाबी याची जातीने काळजी घेतली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा माणूस वेगळा आहे याचेच हे द्योतक.
एकनाथ शिंदे यांचे व्यक्तिमत्व जनमानसांत दिवसेंदिवस व्यापक होताना,रूजताना दिसत आहे.विरोधकांना हे सर्व न पचणारे आहे.त्यामुळेच विरोधक रोज मुख्यमंत्री शिंदे यांना शिव्या-शाप, दूषने देण्यात आपला पूर्ण वेळ घालवत आहेत.सर्वसामान्य जनता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माणसातला माणूस,लोकांसाठी अहोरात्र झोकून देऊन काम करणारा,लोक कार्यात रमणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पहात आहे.
थेट जनतेत जाऊन काम करण्याच्या आपल्या वेगळ्या कार्यशैलीने मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा नायक ठरले आहेत.
जय शिवराय! जय महाराष्ट्र!
--- संजीव भोर पाटील,
प्रवक्ता,शिवसेना.
