आज मुंबई येथे संबंधित मंत्री,लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांसोबत बैठक : आमदार समाधान आवताडे
पंढरपूर ---(विनोद पोतदार)
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पंढरपूरच्या एमआयडीसीचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात शहरा लगत असणाऱ्या रांझणी, कासेगाव येथील जागा सुचवल्या आहेत.
आमदार आवताडे यांनी पाठपुरावा करून पंढरपूरसाठी एमआयडीसी का गरजेचे आहे. ही बाब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटवून देऊन पंढरपूरच्या एमआयडीसी बाबतचा पाठपुरावा केला आहे.
पंढरपूरच्या एमआयडीसीच्या प्रश्नावर १५ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई येथे संबंधित उद्योग मंत्री,लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिली.
पंढरपूर तालुक्यातील कॉलेजेस व इंजीनियरिंग कॉलेजद्वारे शिक्षण घेऊन अनेक तरुण बेरोजगार होत आहेत. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर शहरातील व ग्रामीण भागातील तरुणांना हाताला काम नसल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात एमआयडीसी भरण्यासाठी आमदार आवताडे यांनी शर्तीचे प्रयत्न केले आहेत.
याबाबत त्यांनी एमआयडीसीच्या जागेचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करत सदरची जागा शहरालगतच्या रांझणी, कासेगाव परिसरातील सुचवली आहे.
सदरच्या परिसरातील सुमारे पावणे दोनशे एकर जागेवर एमआयडीसी उभारण्यात यावी अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.
याबाबत 15 सप्टेंबर रोजी संबंधित मंत्र्यांसोबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
बैठकीनंतर पुढील काही दिवसात जागेचा सर्वे होऊन एमआयडीसी उभारण्याबाबतच्या हालचाली होणार असल्याचे संकेत आमदार अवताडे यांनी दिले आहेत.