पंढरपूर ----
पंढरपूर येथील स्वर्गीय वसंत काळे यांचे चिरंजीव, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि काँग्रेसचे नेते श्री.कल्याण काळे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
कल्याण काळे यांचे वडील सुरुवातीपासून काँग्रेसचे समर्थक होते. १९९५ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी *चंद्रभागा* कारखाना मंजुरी आणि उभारणीसाठी शिवसेनेत प्रवेश केला होता. तात्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने *चंद्रभागा* कारखाना सुरळीत चालू झाला. त्यानंतर वसंत काळे हे पुन्हा काँग्रेस पक्षाच्या कामाला लागले. वसंत काळे यांच्या निधनानंतर कल्याण काळे यांनी त्यांचे राजकीय कार्य काँग्रेस पक्षातूनच चालू केले, त्यानंतर कल्याण काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कास पकडली. पुढे अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कल्याण काळे यांनी शिवसेनेचा मार्ग पत्करला, त्यानंतर पुन्हा काँग्रेसवासी झाले. सन १४ते१९ या काळात परत एकदा भाजप सेना युतीचे सरकार आलेले पाहून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या सत्तेच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक करून राष्ट्रवादी काँग्रेसचे मांडलिकत्व स्वीकारले. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी त्यांच्या *चंद्रभागा* साखर कारखान्याला थकहमी दिली. या सर्व राजकीय तडजोडी कल्याण काळे यांनी *चंद्रभागा* कारखाना डोळ्यासमोर ठेवून केल्या असे बोलले जाते..... म.वि.आ. सरकार मधील सत्तेत असलेल्या शिवसेनेत मोठी फूट पडून ते सरकार कोसळले. शिवसेनेतील बंडखोरी करणाऱ्या आमदारांचे नेते असलेले एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जुळवून घेत सत्ता स्थापन केली. सत्तेतील मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळाले. या राजकीय नाट्यामुळे त्याचे पडसाद सर्व राज्यात उमटु लागले. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील प्रा. तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेतृत्व तानाजी सावंत यांच्याकडे आपसूकच आले. काही दिवसांपूर्वीच सावंत पंढरपूर येथे त्यांच्या पुतण्याच्या घरी आले असता कल्याण काळे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती, त्यावेळेसच कल्याण काळेंच्या राजकीय वाटचालीबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगु लागल्या होत्या. अशातच शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रदेश पातळीवरील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी नेमले गेले, या पदाधिकाऱ्यांमध्ये कल्याण काळे यांचे कट्टर समर्थक आणि *चंद्रभागा* सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर कवडे यांची शिंदे गटाच्या सोलापूर जिल्हा सहसंपर्कपदी निवड केल्याचे नियुक्तीपत्र दिले गेले, त्यामुळेच आपल्या समर्थकाला शिंदे गटात पाठवून कल्याण काळे यांनी आपली शिंदे गटात जाण्याची वाट सुकर केली आहे की काय? असे बोलू जाऊ लागले आहे.
कल्याण काळेंचा जीवनातील एकूण राजकीय प्रवास पाहिल्यानंतर त्यांच्या साखर कारखान्यासाठी आणि येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेची उमेदवारी पक्की करण्यासाठी ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामील होऊ शकतात असा राजकीय जाणकारांचा होरा आहे.