सोलापूर दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर - पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी सोलापूर शहर व परिसरात आयोजित 'संवाद दौरा' अंतर्गत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटीगाठी घेण्यावर आणि मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. या दौऱ्या दरम्यान त्यांनी "गंगा निवास" या निवासस्थानी श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर समितीचे विश्वस्त धर्मराज काडादी यांची सदिच्छा भेट घेतले.
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या सेवेसोबतच सहकार आणि सामाजिक क्षेत्रात सोलापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे धर्मराज काडादी हे सोलापूरचे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. या भेटीदरम्यान काडादी कुटुंबीयांनी डॉ. स्मिता जाधव यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले. या प्रसंगी सोलापूरचा विकास, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी या विषयांवर सकारात्मक व मनमोकळा संवाद झाला. या सदिच्छा भेटीवेळी भाजपा सोलापूर शहराध्यक्षा सौ. रोहिणीताई तडवळकर, स्थायी समिती सभापती सौ. रंजिताताई चाकोते, पुष्कराज काडादी, सौ. तेजश्री काडादी, गजानन धरणे, गिरीश बुगडे, संजय मंठाळे, शांतय्या स्वामी, संजय कुलकर्णी, डॉ. शैलेश पाटील आणि अमोल पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. स्मिता जाधव यांनी सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिर, मार्कंडेय मंदिर, श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्था, दशरथ गोप, होतगी मठ, वालचंद महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय आणि शेळगी येथे भेट देऊन पदवीधरांशी थेट संवाद साधला. शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी मतदान:
'पदवीधरांचा आवाज आता विधानपरिषदेत घुमणार' असा विश्वास व्यक्त करत डॉ. स्मिता जाधव यांनी पदवीधरांना येत्या शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:०० ते दुपारी ४:०० या वेळेत क्रमांक १ ची पसंती देऊन प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
