*भगवान इंगळे लिखित ‘लोभस’ पुस्तकातून सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा प्रवास उलगडणार*
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जीवनचरित्रावर लेखक भगवान इंगळे यांनी लिहिलेल्या ‘लोभस’ या पुस्तकाचे प्रकाशन एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या प्रकाशन सोहळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, लेखक भगवान इंगळे, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, धनश्री धारप, विश्वनाथ साठे, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, सातलिंग शटगार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार आणि पुस्तकप्रेमी उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शासनकर्ती जमात व्हा’ असा क्रांतिकारी संदेश दिला. दलितांसह तळागाळातील सामान्य जनतेचा उद्धार व्हायचा असेल, तर सत्तेत सहभागी होणे आवश्यक आहे, हा विचार सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय प्रवासासाठी प्रेरणादायी ठरला. याच विचारातून त्यांनी सीआयडी खात्यातील नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला.
सत्ता हे लोककल्याणाचे साधन आणि जनकल्याण हेच अंतिम साध्य, अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या राजकीय वाटचालीत जपली. आपल्या कार्यातून त्यांनी असंख्य लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. विरोधकांशीदेखील आपुलकीने आणि सौजन्याने वागण्याची त्यांची शैली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून या पुस्तकात अधोरेखित करण्यात आली आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे हे चरित्र वाचकांना त्यांच्या प्रदीर्घ वाटचालीची ओळख करून देणारे आहे. भगवान इंगळे यांनी शब्दबद्ध केलेल्या या जीवनचरित्राच्या प्रकाशनामुळे त्यांच्या जीवनप्रवासातील आठवणी, विचार आणि कार्याचा लेखाजोखा वाचकांसमोर आला आहे.
▬▬▬ஜ۩ (tp) ۩ஜ▬▬▬
