*श्राद्ध : समज - गैरसमज

*पितृ पंधरवडा निमित्त विशेष लेख*
लेखिका - जयश्री सोनार jayashri.sonar1577@gmail.com सध्या सुरू असलेल्या पितृ पंधरवड्यात अर्थात पितृपक्षात श्राद्ध घालणे आणि न घालणे याविषयी बरेचजण आपापले विचार मांडत आहेत. जितके आस्तिक किंवा नास्तिक असणे नैसर्गिक आहे, तितकेच श्राद्ध ही संकल्पना मानणे किंवा न मानणे हेही नैसर्गिक आहे. हा ज्याचा त्याचा ऐच्छिक विषय आहे. काही लोक आयुष्यभर आई-वडिलांची सेवा करतात, खाऊ-पिऊ घालतात; परंतु श्राद्ध ही संकल्पना त्यांना मान्य नसते. ते म्हणतात, “आम्ही जिवंतपणीच आमच्या आई-वडिलांना खाऊ-पिऊ घातले आहे. आता आम्हाला श्राद्ध घालण्याची आवश्यकता वाटत नाही.” वैदिक धर्मात ‘पुत्र’ म्हणजे माता-पित्यांना ‘पु’ नावाच्या नरकातून तारणारा, अशी संकल्पना आहे. अश्वत्थामा जेव्हा पांडवांच्या पाच मुलांची शिरे कापून घेऊन येतो, तेव्हा दुर्योधन खूप दुःखी होतो, खूप रडतो. तो म्हणतो, “पांडव माझे शत्रू होते, त्यांची मुले नव्हती. तू आमचे श्राद्ध घालायला, पाणी द्यायला सुद्धा कोणाला ठेवले नाहीस. तू खूप मोठी अक्षम्य चूक केली आहेस. मी आता शांततेने मरू शकणार नाहीस. तू माझा मृत्यूसमय खराब केला आहेस.” आपण आई-वडिलांचे श्राद्ध घालतो. ब्राह्मण तर्पण करण्यासाठी येतात, तेव्हा आई-वडील, काका-काकू, मामा-मामी, आत्या-फुफा, सासू-सासरे, भाऊ-बहीण, ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचेच नामस्मरण करतात आणि सर्वांना पाणी देतात. पूर्वी कधी कोणी अपघाताने, आजाराने किंवा अल्पवयात वारले असेल, त्यांनाही पाणी दिले जाते. कोणाला मुलंबाळे नसतील, कुलात कोणी नसेल, त्यांनाही पाणी दिले जाते. म्हणजे सर्वांना पाणी दिले जाते. स्मरण होते. आठवण होते. आपण डी.डी.ने पाठवलेले तेच पैसे समोरच्या व्यक्तीला मिळत नाहीत; पण दुसरे मिळतात ना! पितृ आणि गरुडपुराण हा खूप गहन शास्त्राचा आणि मोठा विषय आहे. काही समाजसुधारक यावर टीका करतात. शोध घेतात, संशोधन करतात. तोसुद्धा मोठा विषय आहे. तथापि, आपण आज थोडक्यात पाहूया. आई-वडिलांची सेवा आणि आदर सर्वांनी केलाच पाहिजे. पती-पत्नीनेही चांगले राहिले पाहिजे. शेजाऱ्यांनी चांगले राहिले पाहिजे. दोन शेजारी देशांनीही चांगले राहिले पाहिजे; पण आपले शेजारी देश कसे आहेत, हे स्वतःलाच विचारा. माणूस म्हणून आई-वडीलही कधी कधी चुकू शकतात, तर मुलेही चूक करू शकतात. “बशर गलती का पुतला है, गलती हो ही जाती है। जो गलती करके सुधर जाए, उसे इंसान कहते हैं।” अनंत राजे झाले, गेले; अंती मुखात माती. उरलाएकच राम राहिली त्याची दिगंत कीर्ती. भगवान राम आणि श्रावणबाळ यांचे नाव प्रथम घ्यावेसे वाटते. *नाती, गैरसमज आणि पितृस्मरण* : भीष्म पितामह इतके महान असूनही कौरव त्यांचे ऐकत नव्हते. 'अति परिचयात अवज्ञा' अशी म्हणच आहे. यूट्यूबवर खूप चर्चेत असलेले, विनोदी, समाजसुधारक, स्पष्टवक्ते कीर्तनकार सांगतात की, कितीही महान पुरुष असला तरी त्याच्या बायकोइतका त्याचा अपमान कोणीही केला नसेल. बायकोइतकी इज्जत कोणीच उतरवली नसेल. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन अनेकवेळा रात्री घरी जात नसत. ते रस्त्यावर, बाकावर, बागेत झोपत असत, कारण त्यांची बायको कजाग आणि भांडखोर होती. “शांत पत्नी नाही ज्याचे घरी, अरण्य दूर नाही त्यासी” अशी म्हण आहे. खूप जवळची व्यक्ती कितीही महान असली, तरी तिचे महत्त्व कधी कधी आपल्याला वाटत नाही. भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या मुलांना सांगितले होते की, साधू-संत आणि गायींचा सन्मान करा. परंतु ते संतांची परीक्षा घ्यायला गेले आणि विनाश ओढवून घेतला. जुने लोक म्हणायचे, “मन आकलते पण जन आकलत नाही.” म्हणजे एखाद्या गोष्टीचे मनाला आकलन झाले तरी बोली भाषेत मुलांना जनवाड किंवा जन असे म्हणतात, हिजन ऐकले, असे नाही. भारतात अनेक महापुरुषांना जग नतमस्तक होत होते; परंतु त्यांचे नातेवाईक त्यांना त्रास देत होते. चांगल्या लोकांचीही नाती बिघडू शकतात. भागवतातील धुंदकारीचे उदाहरण पाहा ना! मागे मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत देखण्या नायकाचे वृद्धापकाळात एकाकी अवस्थेत निधन झाले. प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर खूप टीका केली. काही दिवसांनी त्यांच्या मुलाने अनेक यूट्यूब चॅनेलवर मुलाखती देऊन वास्तव काय आहे, ते सांगितले. ज्याच्या त्याच्या घरचे ज्याला त्यालाच माहीत असते. आपण बाहेरून पूर्ण माहिती न घेता कोणाबद्दल बोलणे चुकीचे आहे. आपल्या घरातील गोष्टी गोपनीय ठेवण्याचा आणि त्या चव्हाट्यावर आणण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. तथापि, भांडण झाले म्हणून त्यांनी पुन्हा एकत्र येऊ नये का? मागचे सगळे विसरू नये का? गोड होऊ नये का? महापुरुष सांगतात की, मृत्यूनंतर आई-वडिलांची जास्त किंमत समजते. ते देवता होतात आणि देवतांसारखे वाटतात. कितीही खराब प्रवृत्तीचे लोक वारले, तरी मुले रडतात. वडिलांनी जन्म दिला होता. कधीतरी जीव लावला असेल. कितीही मनमुटाव वाढला, तरी मुले त्या गोष्टी सोडून देतात . नंतर पश्चात्ताप व्यक्त करतात. प्रत्येक नात्यातील भांडण विसरले पाहिजे, मग मुलगा आणि आई-वडिलांनी का विसरू नये? कधीकधी ग्रह-तारेसुद्धा या सर्वाला कारणीभूत असतात, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. सूर्य पिता, चंद्र माता, शुक्र पत्नी, बुध बुद्धी, गुरु पती, भाऊ-मंगल असे विविध ग्रह-तारे त्यांचे सकारात्मक-नकारात्मक प्रभाव आपल्या नात्यांवर टाकतात, अशी मान्यता आहे. आता सगळे विसरून निदान मेल्यावर तरी ते गोड झाले. त्यांचे श्राद्ध घालतात, तर्पण करतात, सर्व पितरांची आठवण काढतात आणि पश्चात्ताप करतात. देवतासुद्धा त्यांना पंधरा दिवस पृथ्वीवर पाठवतात, अशी धार्मिक मान्यता आहे. त्या निमित्ताने लोक गायींना, ब्राह्मणांना, गोरगरिबांना दानधर्म करतात आणि आपल्या पूर्वजांची आठवण करतात. मग आपण तिसऱ्या-तिसऱ्या व्यक्तींना नावे का ठेवत आहोत? हा सर्वस्वी त्यांचा आणि त्यांच्या पितरांचा प्रश्न आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form