राष्ट्रीय एकता दिन व भारत पर्वानिमित्त गुजरातमध्ये महाराष्ट्र पर्यटनाचे विशेष दालन

महाराष्ट्राची पर्यटनस्थळे,खाद्यसंस्कृती आणि समृद्ध वारसा पर्यटकांसमोर मांडणार
मुंबई, दि. ३० ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्वाच्या निमित्ताने गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित उपक्रमात महाराष्ट्र पर्यटन विभाग सहभागी होत आहे. या उपक्रमांतर्गत विभागाच्या वतीने विशेष पर्यटन दालन उभारण्यात येणार असून त्यामाध्यमातून महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे, समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती आणि हस्तकलेचे दर्शन देशभरातील पर्यटकांना घडविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय उपसंचालक विजय जाधव उपस्थित राहणार आहेत. या दालनात महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांची माहिती देणारी माहितीपत्रके आणि पर्यटनविषयक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पैठणी विणकामाचे सादरीकरण, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि हस्तकलेच्या विविध वस्तू हे या दालनाचे विशेष आकर्षण असणार आहे. यासोबतच इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट संस्थेच्या (आयएचएम, दादर) किचन स्टुडिओच्या माध्यमातून खाद्यसंस्कृतीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविण्यासाठी या उपक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य पर्यटनस्थळे, साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन आणि सांस्कृतिक परंपरा यांची माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे. पैठणीसारखी पारंपरिक वस्त्रकला स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळण्यासोबतच राज्यातील पर्यटन व्यवसाय, स्थानिक कला आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे. पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव (भा.प्र.से.) म्हणाले, "राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख करून देणे, परस्पर संवाद वाढविणे आणि विविधतेतील एकतेची भावना अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक ओळख, ऐतिहासिक वारसा, वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपरंपरा आणि पर्यटन क्षेत्रातील विविध संधी देशभरातील पर्यटकांसमोर मांडण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे." पर्यटन संचलनालयाचे संचालक विकास पानसरे (भा.प्र.से.) म्हणाले, "महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर एक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी राज्यातील पर्यटनवैविध्याची देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी मांडणी करणे आवश्यक आहे. गुजरातमधील केवडिया एकता नगर येथे आयोजित या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य, पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक परंपरा व्यापक स्तरावर पोहोचविता येणार आहेत. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्राची जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख अधिक दृढ होण्यास नव्या पर्यटकांना आकर्षित करण्यास आणि राज्यातील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक व रोजगाराच्या संधी वाढविण्यास चालना मिळेल."

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form