पंढरपूर /प्रतिनिधी
निवडणूक जिंकू अथवा हारू, शिक्षकांच्या प्रश्नांसाठीचा संघर्ष थांबणार नाही, असा निर्धार व्यक्त करत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राजकीय पक्षाच्या उमेदवारीतून लढणार असल्याचे जाहीर केले.
पंढरपूर येथे पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सावंत यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळात शिक्षक मतदारांशी व्यापक संपर्क साधण्याचे आवाहन केले.
शिक्षकांच्या जुनी पेन्शन, टप्पा अनुदान आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांना विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शासनाकडून मिळणारी प्रतिपूर्ती या प्रमुख प्रश्नांवर आगामी काळात व्यापक लढा उभारण्याची भूमिका त्यांनी मांडली. २८ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षकांचा स्वाभिमान कोणत्याही दबावापेक्षा मोठा आहे. मतदानाचा अधिकार शिक्षकांनी आपल्या विवेकाने वापरला पाहिजे, असे सावंत म्हणाले.
कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यातील संपर्क वाढवून शिक्षकांच्या प्रश्नांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी, अशी सूचनाही त्यांनी केली. मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील कार्यकर्ते व शिक्षक उपस्थित होते.
