शॉर्टसर्किटने शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टावर पाणी

कोर्टीत एक एकर ऊस जळाला; नबीलाल नदाफ यांचे मोठे नुकसान
पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतातील तब्बल एक एकर ऊस जळून पूर्णपणे खाक झाल्याची घटना घडली आहे. येथील शेतकरी नबीलाल हुसेन नदाफ यांच्या शेतातील ऊसाला अचानक आग लागल्याने काही वेळातच संपूर्ण ऊस जळून गेला. या घटनेत नदाफ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोर्टी परिसरातील शेतात नबीलाल नदाफ यांनी एक एकर क्षेत्रावर ऊसाची लागवड केली होती. ऊसाची वाढ चांगली झाल्याने यंदाच्या गळीत हंगामात या क्षेत्रातून ७० टन एकरी उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, शेतातून गेलेल्या वीजवाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे अचानक ठिणगी पडून ऊसाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ऊसाचे पीक पूर्णपणे उभे जळून खाक झाल्याने शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. ऊस जळाल्याने अपेक्षित उत्पादन तर हातचे गेलेच, शिवाय लागवडीसाठी झालेला खर्चही वाया गेला आहे. ऊस जळाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस जळून गेला होता. वीजवाहिन्या, खांब व विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होऊन शेतातील पिकांना आग लागण्याच्या घटना अधूनमधून घडत आहेत. त्यामुळे महावितरणने ग्रामीण भागातील वीजवाहिन्या व विद्युत यंत्रणेची पाहणी करून धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून झालेल्या नुकसानीची संबंधित विभागाने पाहणी करून पंचनामा करावा आणि नदाफ यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form