"निझामशाहिच्या जुलूमी राजवटीविरुद्ध जेंव्हा मराठवाडा पेटून उठला, तेंव्हा फक्त सोन्याला आकार देणारे हात बंदुकीची नळी आणि क्रांतीची मशाल हाती घ्यायला मागे सरकले नाहीत. तीन हुतात्म्यांचे बलिदान आणि तेहतीस सैनिकांचे शौर्य हा सोनार समाजाचा इतिहास देशाच्या शिरपेचातील तुरा आहे."
१५ ऑगस्ट १९४७ रोजी संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा अभिमानाने फडकत होता. मात्र या आनंदाच्या क्षणीही देशाचा एक मोठा भाग अंधारातच होता, तो म्हणजे हैद्राबाद संस्थान ! मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग मिळून बनलेल्या या विस्तीर्ण संस्थानावर निजामाची जुलमी राजवट होती. हा स्वातंत्र्यलढा केवळ एका राजवटीविरुद्ध नव्हता तर तो अस्मिता, संस्कृती आणि मानवी हक्काच्या रक्षणाचा लढा होता. या अत्यंत कठीण आणि ऐतिहासिक लढ्यात समाजातील प्रत्येक घटकाने हिरीरीने भाग घेतला. यामध्ये सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिव (उस्मानाबाद) या भागातील सोनार समाजाने देशासाठी आणि आपल्या भूमीसाठी शौर्याची जी पराकाष्ठा केली, ते योगदान इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
*निजामाची जुलमी राजवट आणि प्रतिकाराची ठिणगी -*
निजामाचे राज्य आणि त्याची क्रूर खाजगी सेना म्हणजेच रझाकार यांनी जनतेवर अनन्वित अत्याचार सुरू केले होते. सामान्य माणसाला जगणे असह्य झाले होते. वंदे मातरम म्हणण्यावर बंदी होती, हिंदू सणांवर निर्बंध होते. अशा दडपशाहीच्या काळात अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे धाडस सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिवच्या मातीने दाखवले. सोनार समाजातील देशभक्त तरुणांनी केवळ स्वतःच्या व्यवसायापुरते मर्यादित न राहता देशकार्याला प्राधान्य दिले. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदराव नानल, कॅप्टन व्यंकटराव जोशी, आ. कृ. वाघमारे, अण्णाराव पाटील, भाई उद्धवराव पाटील, वि. रा. पाटील यांसारख्या महान नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोनार समाजातील अनेक वीर या सशस्त्र आणि निःशस्त्र लढ्यात हिंमतीने उतरले.
*सोनार समाजाचे योगदान : संघटन आणि गुप्त हालचाली -*
लढ्यात केवळ प्रत्यक्ष युद्धच करायचे नव्हते तर क्रांतिकारकांना शस्त्रे पुरवणे, निरोप पोहोचवणे, गुप्त आश्रय देणे,भुयारी मार्ग तयार करणे आणि आर्थिक रसद पुरवणे ही कामेही अत्यंत जोखमीची होती. सोनार समाजातील स्वातंत्र्य सैनिकांनी यात मोलाची भूमिका बजावली. आपल्या कौशल्याचा वापर करून निझामी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून संदेश पोहोचवणे, लपून-छपून शस्त्रे तयार करणे, आंदोलकांना गुप्त आश्रय देणे अशी धाडसी कामे केली. सोलापूर सारख्या सीमावर्ती भागातून आणि लातूर-बीड-धाराशिवच्या खेड्यापाड्यातून या समाजाने क्रांतीची मशाल पेटती ठेवली.
*तीन हुतात्म्यांचे सर्वोच्च बलिदान -*
या हैद्राबाद मुक्ती संग्रामात सोनार समाजाने आपल्या रक्ताचे अर्घ्य दिले. शत्रूंच्या गोळीबाराला आणि अमानुष अत्याचाराला न डगमगता सामोरे जात सोनार समाजातील या तीन वीर पुत्रांनी हौतात्म्य पत्करले - *हुतात्मा काशिनाथ चिंचाळकर (धारूर), शंकर बापूराव सोनार (तडवळे) आणि गणपती भगवान दीक्षित (पानगाव).* त्यांचे हे बलिदान केवळ एका समाजाचे राहिले नाही तर ते संपूर्ण राष्ट्राचे झाले.
*३३ स्वातंत्र्य सैनिकांचे असीम शौर्य -*
या लढ्यात प्रत्यक्ष रणांगणात उतरून, तुरुंगवास भोगून आणि रझाकारांना सळो की पळो करून सोडणारे ३३ स्वातंत्र्य सैनिक सोनार समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. घरातून बाहेर पडताना परत येऊ की नाही याची खात्री नसतानाही या वीरांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी जंग जंग पछाडले. या शौर्याची दखल घेऊनच पुढे भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने त्यांना सन्मानपत्र आणि सन्मान पेन्शन देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
*आजच्या पिढीसाठी प्रेरणा*
या लढ्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे सोनार समाजाने आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायापेक्षा देशाच्या व्यवसायाला मोठे मानले. ज्या हातांनी दागिने घडवायचे, त्याच हातांनी स्वातंत्र्य घडवले. अनेकांनी आपल्या दुकानातील जमा-पूंजी, प्रसंगी पत्नीच्या अंगावरील दागिने विकून भूमिगत चळवळीला पैसा पुरवला. ही केवळ आर्थिक मदत नव्हती, तर तो एका पिढीने दुसऱ्या पिढीच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला सर्वात मोठा दागिना होता. आज आपण जो मोकळा श्वास घेतो, त्यात या ३६ वीरांच्या त्यागाचा सुगंध आहे.
*आजची स्थिती : दोन हयात देवदूत -*
काळ बदलला, दशके उलटली. मात्र अत्यंत समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आजमितीला या सुवर्ण लढ्यातील २ स्वातंत्र्य सैनिक आपल्यामध्ये हयात आहेत. हे दोन ज्येष्ठ वीर म्हणजे केवळ व्यक्ती नसून, स्वातंत्र्याच्या धगधगत्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत.चालता बोलता इतिहास आहेत. निझामी अत्याचाराविरुद्ध लढतानाचे त्यांचे अनुभव, त्यांच्या डोळ्यातील ती धगधगती ईर्ष्या आजही आपल्याला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देते. या हयात स्वातंत्र्य सैनिकांच्या चरणी संपूर्ण सोनार समाजाचा मानाचा मुजरा .!
*सोनार समाजातील ०३ हुतात्मे व 33 स्वातंत्र्य सैनिकांची नामावली (एकूण ३६)*
*हुतात्मे :*
१) हुतात्मा काशिनाथ किसनराव चिंचाळकर - धारूर, बीड
२) हुतात्मा गणपती भगवान दीक्षित - पानगाव, बार्शी
३) हुतात्मा शंकर बापूराव सोनार - तडवळे, धाराशिव
*हयात स्वातंत्र्य सैनिक :*
४) श्री. वसंतराव पोतदार आलूरकर, सोलापूर (हयात, वय ९७)
५) श्री. भास्करराव नायगावकर, धाराशिव (हयात, वय ९८)
*इतर स्वातंत्र्य सैनिक.*
*६) कै. शंकरराव जडे - लातूर (दैनिक लातूर समाचारचे संस्थापक)*
७) प्रल्हादराव कारीकर (धारूर) सोलापूर
८) रामचंद्र पोतदार (भुरीकवठे, अक्कलकोट) सोलापूर
९) श्रीधर पंडित
१०) नंदा उर्फ षडानन जडे
११) प्रभावती जडे
१२) शांताबाई पोतदार ( हयात )
१३) पार्वतीबाई मैंदर्गीकर
१४) दत्तात्रेय पोतदार - देगाव (वा.) मोहोळ
१५) वसंतराव ढेरे - देगाव (वा.) मोहोळ
१६) विनायक सोनार - माकणी
१७) मधुकर पोतदार-वेदपाठक - मुरूम
१८) वामन पोतदार - उमरगा
१९) मुरलीधर पोतदार - मुरूम
२०) प्रल्हाद महामुनी - मुरूम
२१) व्यंकट महामुनी - मुरूम
२२) दिगंबर पोतदार - मुरूम
२३) विश्वनाथ वेदपाठक - मुरूम
२४) माधवराव पोतदार - मूळज
२५) किसन सोनार - इट
२६) सीताराम सोनार - इट
२७) नामदेव पोतदार - नळदुर्ग
२८) काशिनाथ सोनार - इटकूर
२९) नारायण सोनार - इटकूर
३०) व्यंकटराव पोतदार - किल्लारी
३१) रघुनाथ वेदपाठक - लातूर
३२) जगन्नाथ पोतदार - लातूर
३३) किसन सोनार - लातूर
३४) किसनराव पोतदार - वडवळ (ना.) चाकूर
३५) गणपतराव पारखे - कुर्डुवाडी
३६) एकनाथ महामुनी - नळदुर्ग
सोनार समाजाचा हा जाज्वल्य इतिहास प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचायला हवा. हेच या दिनाचे खरे औचित्य ठरेल.
१७ सप्टेंबर १९४८ रोजी अखेर निजामाची सत्ता लयाला गेली आणि मराठवाडा मुक्त झाला. या सर्व हुतात्म्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना (हयात असणाऱ्या दोन्ही देवदूतांसह) मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम !
*जय हिंद! जय महाराष्ट्र!*
*- वसंत पोतदार, सोलापूर - मो. ९४२३० ६५९१५*
