कास्ता पाईप कंपनीकडून विठ्ठल भक्तसेवेसाठी रेनकोट, चटई, प्रसाद पिशव्या व हरिपाठ पुस्तिकांचे दान

पंढरपूर / प्रतिनिधी आषाढी यात्रा व वारकरी भक्तांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत कास्ता पाईप कंपनीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला विविध साहित्य भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. विठ्ठलावरील श्रद्धा, भक्ती आणि वारकरी संप्रदायाविषयी असलेली आपुलकी या भावनेतून कंपनीचे मालक शिवसिंह मेहता यांच्या संकल्पनेनुसार तसेच कंपनीचे सीईओ प्रदीप वेदुला यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतील कर्मचारी बांधवांना पावसाळ्यात सेवा बजावताना उपयोगी पडावेत म्हणून उच्च दर्जाचे रेनकोट वितरित करण्यात आले. तसेच भाविकांच्या सेवेसाठी मंदिर परिसरात वापरण्यासाठी १५ फूट बाय ५० फूट आकाराची चटई मंदिर समितीला भेट देण्यात आली.
याशिवाय भाविकांना प्रसाद वितरणासाठी ५० हजार उच्च प्रतीच्या प्रसाद पिशव्या तसेच वारकरी संप्रदायाच्या नित्य पठणातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या 'हरिपाठ'च्या ७५ हजार प्रती मंदिर समितीला भेट स्वरूपात देण्यात आल्या. याशिवाय पोलीस, शासकीय कर्मचारी, पत्रकार यांनाही उच्च प्रतीचे रेनकोट वाटप करण्यात आले. या साहित्याचा मोठ्या प्रमाणात भाविकांना लाभ होणार असून यात्रेच्या व्यवस्थापनालाही यामुळे हातभार लागणार आहे.
या कार्यक्रमाला मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्यासह मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कास्ता पाईप कंपनीकडून मार्केट हेड वैभव केळकर, महाराष्ट्र सेल्स प्रमुख प्रदीप पैठणे तसेच तीन जिल्ह्यांचे प्रमुख गोपाळ आदोने उपस्थित होते.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने कास्ता पाईप कंपनीने वारकरी भक्तांच्या सेवेसाठी केलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त करत कंपनीचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी कंपनीच्या वतीने वैभव केळकर यांनी मंदिर समिती प्रशासन, सदस्य व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही श्री विठ्ठलाच्या सेवेसाठी आणि वारकरी भक्तांच्या सुविधेसाठी अशाच प्रकारचे सेवाभावी उपक्रम राबविण्याची संधी मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी श्री विठ्ठल चरणी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form