*७०० किमीचा प्रवास करून मोहोळ तालुक्यात दाखल; जिल्हा प्रशासनाकडून उत्स्फूर्त स्वागत*
*पंढरपूर, दि. २१:* आषाढी वारीसाठी निघालेली *आदिशक्ती संत मुक्ताई पालखी* आज सुमारे *७०० किलोमीटरचा प्रवास* करून *मौजे आष्टी, ता. मोहोळ* येथे पोहोचली.
*जिल्हा प्रशासनाकडून स्वागत*
पालखीचे आष्टी गावात आगमन होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नोडल अधिकारी तथा जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल क्षीरसागर, जिल्हा कृषी अधीक्षक (जि.प.) श्री. बावकर, पोलीस निरीक्षक श्री. जाधव, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, सरपंच व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
पालखीतील वारकरी व दिंडीप्रमुखांचे हार-तुरे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशासनाकडून पाणी, आरोग्य, स्वच्छता व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती.
*विश्वस्तांकडून आभार*
प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांबद्दल व उत्कृष्ट नियोजनाबद्दल *आदिशक्ती संत मुक्ताई संस्थानचे विश्वस्त श्री. रवींद्र पाटील महाराज* यांनी समाधान व्यक्त करून जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
“संपूर्ण प्रवासात प्रशासनाने प्रत्येक टप्प्यावर चांगल्या सुविधा दिल्या. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अधिकारी-कर्मचारी सतत तत्पर आहेत,” असे पाटील महाराज म्हणाले.
आष्टी येथे आजचा मुक्काम करून उद्या पहाटे पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
******
