*आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा*

*'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची'* *एअर ॲम्बुलन्स, ३५३ रुग्णवाहिका, १५६ 'आपला दवाखाना' आणि ६९ आयसीयूंच्या माध्यमातून आरोग्य विभागाची प्रभावी सेवा*
मुंबई/पुणे/पंढरपूर, दि. २४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाने आषाढी वारी २०२६ दरम्यान लाखो वारकरी भाविकांना सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. 'भक्ती विठोबाची... सेवा आरोग्याची' या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत आजपर्यंत ७ लाख २३ हजार ८२ वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे.
आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या अध्यात्म, संस्कृती आणि सेवाभावाचा सर्वोच्च सोहळा आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वीकारत पालखी मार्गापासून पंढरपूरपर्यंत व्यापक आरोग्य यंत्रणा उभी केली. यंदाच्या वारीत प्रथमच एअर ॲम्बुलन्स आणि 'आरोग्यसंपन्न वारी' या डिजिटल ॲपच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित करण्यात आल्या. आरोग्य विभागाने पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ सुसज्ज आयसीयू, १५६ 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टर यांची नियुक्ती केली. पंढरपूरमध्ये २४ तास कार्यरत आयसीयू, दोन दिवसांचे महाआरोग्य शिबिर, मोफत चष्मा वाटप, डिजिटल मॅपिंग, पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, हॉटेल व धाब्यांतील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान आणि व्यापक आरोग्य जनजागृती यांसारख्या विविध सेवा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. आजपर्यंत ७ लाख १८ हजार ६३५ बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात आले असून ४ हजार ४४७ रुग्णांना आंतररुग्ण सेवा देण्यात आली आहे. तसेच १ हजार ५३३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. विविध आजारांवरील तपासणी व उपचारांमुळे वारकऱ्यांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध झाली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form