*धन्य कोर्टीतीर्थ तीर्थाचे माहेर*
*तिथे नांदे शंकर पती पार्वतीचा*
*कोर्टी तीर्थामाजी लिंग असती अपार* l
*संख्या कोटी थोर काशी तीर्थ* ll 1 ll
*तया तीर्थावरी साधू विसोबा राही l*
*उपदेश घेई चांगयाचा l*
*चांगयाने तप साधीले अपार l*
*पुजला विश्वेश्वर कोर्टी माजी ll2ll*
*काशीची गंगा नित्य वास करी l*
*तिथे माझे माता पिता समाधीस्त* l
*सोमवार वैशाख शुक्ल त्रयोदशिसी l*
*देव येती तीर्थासी विमानासवे ll3ll*
*अच्युत सोनार शिवरूप झाला l*
*हा:हाकार माजला दानवी मानवी* l
*नामदेव सवे संतमेळा जमला विसोबा चांगा आला राउळासीll4ll*
*सावित्री माता सतीरूप झाली* *सवासिन गेली वैकुंठासी l*
*काशी तीर्थावरी तयांची समाधी* l
*उभयता जाहले हरीरूप* ll 5 ll
उपरोक्त अभंग संत श्रेष्ठ नरहरी महाराजांचा असून संत नरहरी महाराज सुवर्णकार समाजातील एक थोर संत, त्यांचा जन्म पंढरपूर सारख्या पवित्र भूमीत, श्रावण शुक्लत्रयोदशी, अनुराधा नक्षत्रावर, शके १११५ इ.स.११९३ बुधवार रोजी पहाटे प्रात काळी झाला त्यांच्या बारशाच्या दिवशी सुवर्णकार समाजाचे महान योगी, तपस्वी, चांगदेव महाराज आले होते, त्यांनीच बाळाचे नाव नरहरी असे ठेवले.
त्यांच्या वडिलांचे नाव अच्युतराव पोतदार व आईचे नाव सावित्रीबाई, वडिलांचा पिढीजात सोन्याचे जडणघडणीचा व्यवसाय, पत्नी सावित्रीबाई घर सांभाळून त्या सुवर्ण व्यवसायात जमेल ती मदत करीत असत, ते दोघे कट्टर शिवभक्त शिवाच्या परमभक्तीने त्यांना मल्लिकार्जुनाच्या मंदिरात पूजा करीत असताना साक्षात भगवान शंकर प्रगट झाले, आणि उभयतांना परमधामाला चालण्या विषयी संख्येत दिला, आणि दोघा उभयतांनी भगवान शंकराच्या साक्षात्कारानंतर त्याच क्षणी दोघांनी देहत्याग केल्यावर ईश्वरचरणी लीन झाले, त्यांचे मरण तर समाधी स्थळ पंढरपूर पासून जवळच सात किलोमीटर अंतरावर नदीकाठी निसर्गरम्य परिसरातील कोटी लिंग म्हणजे कोर्टी हे कोटी शिवलिंगाचे पवित्र ठिकाणी, दोघांचा आत्मा एकाच वेळी परमात्म्यात विलीन होण्याची आश्चर्यकारक घटना घडली, कोर्टी हे शैव भक्तांचे गाव, याच तीर्थक्षेत्री काशी तीर्थावर त्यांचे समाधी स्थळ आहे, माता-पित्यांच्या विरहाने नरहरी महाराजांना अत्यंत दुःख झाले, पुढे प्रेमळ पत्नीचा सहवास व सोनेरी कलात्मक व्यवसाय व शिवभक्ती यामध्ये ते दुःख विसरुन पंढरपुरा राहू लागले.
नरहरी महाराजांनी अनेक अभंग येथे लिहिले.
*उपरोक्त अभंगातून संत नरहरी महाराज आपल्या शिवरूप आई-वडिलांची माहिती देत आहेत*
श्रीक्षेत्र कोर्टी तीर्थात, रोज काशीची गंगा वास करते, त्याच ठिकाणी कोटी शिवलिंग आहेत, अशा या पवित्र तीर्थस्थानी माझे आई वडील समाधिस्थ आहेत. वैशाख महिन्यातील शुक्लत्रयोदशीला जर योगायोगाने सोमवार आला तर, त्यादिवशी त्या ठिकाणी भगवान शंकर पुष्पक विमानाने येत अशी अख्यायिका आहे, या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी संत विसोबा खेचर साधनेसाठी राहत, व त्या ठिकाणी थोर तपस्वी चांगदेव महाराज यांचा उपदेश घेत, चांगदेव महाराजांनी तप साधने द्वारे अनेक विद्या प्राप्त केल्या, आणि ते या पवित्र ठिकाणी शिवदर्शनासाठी नेहमी येत असत.
नरहरी महाराजांचे वडील अच्युत बाबा व माता सावित्रीबाई हे कट्टर शिवभक्त एक दिवशी तेथील मल्लिकार्जुन मंदिरात पूजा करीत असताना, शिव प्रगट झाले प्रसन्न होऊन शिवलीन होण्याची आज्ञा केली, प्रत्यक्ष शिवदर्शन व साक्षात्कारामुळे त्यांच्या वडिलांनी देहत्याग केला, व ईश्वरचरणी लीन झाले, त्यांची पत्नी सावित्रीबाई याही सती गेल्या व ती दोघे शिव रूप झाली, दोघांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व अहाकार माजला, पंढरपूरहून संत नामदेव महाराज, संत विसोबा, संत चांगदेव महाराज, याशिवाय अनेक संतांसह कोर्टी येथे दाखल झाले, समाधीपूर्व शिव आराधना भजन पूजन झाले, सर्व संतांनी हळहळ व्यक्त करून सास्रुनयनांनी समाधीवर पुष्पवृष्टी झाली.
अशा या *शैवभक्तांचे गाव कोर्टी येथील काशी तीर्थावर त्यांच्या समाधी असून शिवभक्तांचे व सुवर्णकार समाजाचे तीर्थक्षेत्र आहे.*
समाधी स्थळाचा लवकरच जीर्णोद्धार होईल.
उपरोक्त अभंगातून संत नरहरी महाराजांनी श्रीक्षेत्र कोर्टी चे महात्म्य, तेथील काशी तीर्थाचे पावित्र्य आणि आई वडील यांच्या समाधीचे अध्यात्मिक महत्त्व व्यक्त केले आहे.
*संतश्रेष्ठ नरहरी महाराज, शिवरूप आई वडील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.* 🌸🌸🌸🌸🙏🏻
*उपरोक्त स्वलेखन प्रकाशित संत शिरोमणी "नरहरी महाराज चरित्रामृत" पुस्तकातून (२०२२) सविस्तर चरित्र लेखन अभंग निरूपणासह चालू आहे.*
*अभंग निरूपण...✒️*
*श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण जि. सातारा, फोन.९९७०७४९१७७*
