*रुग्णवाहिका, डॉक्टर, आरोग्य केंद्रे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व इतर आवश्यक सुविधा एका क्लिकवर उपलब्ध*
पंढरपूर , दि. २६ : मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी २०२६ निमित्त विकसित करण्यात आलेल्या 'आरोग्यसंपन्न वारी' वेब ॲपला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १ लाख ८ हजार ३८ वारकरी भाविकांनी या वेब ॲपचा लाभ घेतला असून, वारीदरम्यान आवश्यक आरोग्य सेवा व इतर सुविधा सहज उपलब्ध झाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे वेब ॲप विकसित करण्यात आले. या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा, डॉक्टरांची माहिती, आरोग्य केंद्रे, 'आपला दवाखाना', पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, स्वच्छतागृहे, मुक्काम व विसावा स्थळे तसेच महत्त्वाचे संपर्क क्रमांक यांसह विविध अत्यावश्यक सेवांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली होती.
आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध व्हावा तसेच आवश्यक आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने हे वेब ॲप प्रभावी ठरले. विशेष म्हणजे वारीदरम्यान अनेक वारकरी भाविकांनी या वेब ॲपचा वापर करून विविध सेवांचा लाभ घेतला आहे.
मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सर्व वारकरी भाविकांना या वेब ॲपचा अधिकाधिक वापर करण्याचे तसेच आपल्या नातेवाईक, मित्र आणि परिचितांपर्यंत ही माहिती पोहोचविण्याचे आवाहन केले होते.
