*वात्सल्य मूर्ती चंद्रकला काकी कारीकर ...

*वात्सल्य मूर्ती चंद्रकला काकी कारीकर : शेकडो हातांना कसब आणि मायेची ऊब देणारी अन्नपूर्णा*. . प्रत्येकाच्या आयुष्यात परमेश्वराने कांही ना कांही त्रुटी, उणीवा ठेवलेल्या असतात. पण त्या त्रुटीचा, उणीवांचा विचार नं करता परमेश्वराने जे चांगले दिलेले आहे त्याचा आनंद मानून आनंदी व सकारात्मक जीवन कसे जगावे याचा आदर्श वास्तू पाठ श्रीमती चंद्रकला काकी कारीकर यांनी आपल्या समोर ठेवला आहे. त्यां बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील उंदरी येथील स्व. एकनाथराव पंडित यांची कन्या व जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय प्रल्हादराव दीनानाथ कारीकर यांच्या पत्नी श्रीमती चंद्रकला काकी कारीकर यांचा दिनांक 28 मार्च 2026 रोजी वृद्धापकाळाने वयाच्या शंभराव्या वर्षी दुःखद निधन झाले. पाच पिढ्यांचा गोतावळा आणि शतायुषी कृतार्थ जीवन जगलेल्या काकींच्या जाण्याने कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. *मायेची सावली आणि अन्नपूर्णा स्वरूप माऊली* चंद्रकला काकींचे जीवन म्हणजे त्याग आणि सेवेचा दरवळणारा एक स्मृतिगंध होता. सराफी व्यवसायात असलेल्या कारीकर कुटुंबाने सामाजिक बांधीलकीचा एक अनोखा आदर्श घालून दिला. आपल्या हयातीत प्रल्हादराव काका आणि चंद्रकला काकीनी समाजातील शेकडो अनाथ आणि गरजू मुलांना आपल्या घरी आश्रय दिला. या मुलांना त्यांनी केवळ राहू दिले नाही तर स्वहस्ते स्वयंपाक करून पोटच्या मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेतली .काकांनी या मुलांना सोनार कामाचे प्रशिक्षण दिले आणि काम शिकल्यानंतर त्यांना स्वतःचे स्वतंत्र दुकान थाटून देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. या शेकडो मुलासाठी काकी खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा आणि आई ठरल्या. आज त्याना मायेची उब देऊन त्यांना स्वावलंबी बनवणारी एक वात्सल्यमूर्ती काळाच्या पडद्याआड गेली. *ऐश्वर्याचा त्याग आणि भक्तीचा वारसा* स्वर्गीय प्रल्हादराव काका कारीकर हे नरहरी मंदिर समिती पंढरपूर चे अध्यक्ष असताना मंदिर बांधण्याचे काम सुरु झाले. घरात सर्व ऐश्वर्य आणि सर्व सुखसोयी हाताशी असतानाही चंद्रकला काकीनी काकांच्या खांध्याला खांदा लावून मंदिर बांधकामाच्या काळात मंदिरातच राहणे पसंत केले. देव कार्यासोबतच समाज कार्यातही या दाम्पत्याचा मोठा वाटा होता. कोल्हापूर येथील पांचाळ विश्वब्राम्हण विद्या प्रसारक संस्थेच्या विध्यार्थी वसतिगृहाच्या ( बोर्डिंग ) अडचणी ओळखून काकांनी समाज आणि इतर दानशूर व्यक्तीकडून अर्थ साहाय्य मिळवून दिले व बोर्डिंगची वास्तू पूर्णत्वास नेली. बोर्डिंगसाठी जागा कोल्हापूर च्या महाराजांनी दिली होती. याची जाणीव ठेऊन चांदीच्या पटावर अक्षरे कोरून सन्मानपत्र प्रदान करून महाराजांचा यथोचित सत्कार आणि गौरव काका काकींच्या हस्ते करण्यात आला. दातृत्वाची आणि सन्मानाची ही परंपरा त्यांनी आयुष्यभर जपली. *आदर्श पुत्र व सुनेची निस्सीम सेवा* चंद्रकला काकींच्या या शतायुषी प्रवसाच्या उतरार्धात त्यांचे एकुलते एक चिरंजीव श्री. भारत प्रल्हादराव कारीकर आणि सून सौ. चंद्रप्रभा भारत कारीकर यांनी त्यांची केलेली सेवा कौतुकास्पद ठरली आहे. प्रकृती साथ देत नसतानाही या सुपुत्राने आणि सून बाईंनी रात्रंदिवस अजिबात न कंटाळता अत्यंत निष्ठा आणि प्रेमाने त्यांची शुश्रुषा केली. मातृ देवो भव हा मंत्र या दाम्पत्याने प्रत्येक्ष कृतीत उतरऊन समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. *कृतार्थ जीवनाचा अंत*... शंभर वर्षाचे भरले -पावले जीवन जगलेल्या चंद्रकला काकीनी आपल्या कुटुंबातील पाच पिढ्या पाहिल्या. त्यांच्या पश्चात पुत्र, सून, नातवंडे, पणतू आणि खापर पणतू असा मोठा परिवार आहे. काकींच्या निधनाने एका सेवाभावी युगाचा अंत झाला असून त्यांनी दिलेला मायेचा सुगंध त्यांच्या कार्यातून सदैव दरवळत राहील. या वात्सल्यमूर्ती माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली. या कृतार्थ जीवनाचा स्मृतिगंध जपत काकींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते व नातेवाईक श्री. जयकुमार नायगावकर यांनी आपल्या भावनांना खालील प्रमाणे शब्दरूप दिले आहे. त्यांच्या या काव्य रुपी श्रद्धांजलीने या श्रद्धालेखाचा समारोप करत आहे. विश्वचक्र हे अविरत फिरते, मरणामधुनी जीवन उरते . अश्रू आजचे उद्या हांसती नवल असे केवढे. सारखा काळ चालला पुढे l धृ l शिशर नेतो हिरवी पाने झाडें उभे ते केविलवाणी, वसंत येता पुनः आगळा. साज तया वर चढे ii 1 ii भीष्म टाकीतो जाळूनी धरती, मुके जलाशय मनी तगमगती. मेघ ओतती त्याच्या वरती. फिरुनी अमृत घडे ii2 ii श्रेष्ठ वीर नर इथे जन्मले, राम कृष्ण हे आले गेले. जग हे अडले त्यांच्यासाठी, असे न केंव्हा घडे ii 3 ii मरणारा तो जगास मुकतो, त्यांच्या मागे कुणी न जातो. दुःख उरी का कवटाळूनीया, नित्य कुणी का रडे ii 4 ii सारखा काळ चालला पुढे, कुणाचे कुणा वाचुनी नडे, सारखे काळ चालला पुढे. भावपूर्ण श्रदांजली.
वसंत पोतदार सोलापूर मोबा - 9423065915

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form