राष्ट्र वैभवासाठी आणि समाज परिवर्तनासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया- बापट

संघाची शाखा हिंदू धर्माचे दर्शन घडविणारे केंद्र - प्रमोद बापट
पंढरपूर येथे 'संघ शताब्दी मंथन पंढरपूर: भारतीय संस्कृती प्राचीन आणि जागतिक स्तरावर वंदनीय आहे. मात्र, जेंव्हा जेंव्हा आपल्याला एकता, एकात्मता, समता आणि बंधुत्व या मूल्यांचा विसर पडला, तेंव्हा तेंव्हा समाजाची अवनिती झाली आणि देश पारतंत्र्यात ढकलला गेला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी केले. पंढरपूर जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित 'संघ शताब्दी मंथन' कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. वैचारिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील विविध मान्यवरांसाठी या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'हिंदुत्व', 'राष्ट्रभक्ती' आणि 'सामाजिक परिवर्तन' या विषयांवर मंथन करण्यात आले. प्रमोद बापट यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय संस्कृतीची महती आणि वर्तमानातील आव्हाने यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, भारतीय संस्कृती ही प्राचीन आणि विश्ववंद्य आहे. अनेक परकीय आक्रमणे झाली, त्या काळात आपल्या संस्कृतीचे तत्त्व काहीसे अधोमुखी झाले, पण ती कधीही नष्ट झाली नाही.ज्या ज्या वेळी आपण एकता, एकात्मता, समता आणि बंधुत्व विसरलो, त्या त्या वेळी समाजात अवनिती निर्माण झाली आणि देश पारतंत्र्यात गेला. आजच्या लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला हक्क विचारण्याचे स्वातंत्र्य आहेच, पण त्यासोबतच आपल्यामध्ये कर्तव्याची जाणीव निर्माण होणे ही काळाची गरज आहे.हिंदुत्वाच्या अनेक व्याख्या केल्या जातात, मात्र संघाची शाखा हे प्रत्यक्ष हिंदू धर्माचे दर्शन घडविणारे ठिकाण आहे. राष्ट्र वैभवासाठी आणि समाज परिवर्तनासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. सचिन लादे यांनी संघाने हाती घेतलेल्या पंचपरिवर्तन या विषयवार मांडणी केली. कुटुंब प्रबोधन म्हणजे कौटुंबिक मूल्ये जपणे. नागरी कर्तव्य म्हणजे जबाबदार नागरिक म्हणून वागणे. स्वबोध याचा अर्थ आपल्या मुल्यांची आणि संस्कृतीची जाणीव ठेवणे. जातीभेद विसरून समाज एकसंध करणे म्हणजे समरसता व पर्यावरणाचे महत्व जाणून निसर्गाचे रक्षण करणे. यासंदर्भात मार्गदर्शन करून डॉ.लादे यांनी उपस्थित मान्यवरांना या विषयात योगदान देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थितांशी प्रमुख वक्त्यांनी संवाद साधला व अनेक विषयांवर चर्चा घडून आली. या चर्चेचे संचालन संजय कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी जिल्हा संघचालक डॉ. रमेश सिद, पंढरपूर जिल्हा कार्यवाह प्रतापसिंह टकले, प्रांत प्रचार मंडळ सदस्य नरेंद्र जोशी, पंढरपूर तालुका संघचालक सुधाकर जोशी यावेळी उपस्थित होते. जिल्हा सहप्रचार प्रमुख जितेंद्र अंतुरकर यांनी स्वागत केले, शाम उत्पात यांनी सांघिक पद्य म्हटले, जिल्हा प्रचार प्रमुख स्वानंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आभार ऍड महेश वाळूजकर यांनी मानले तर तुकाराम चिंचणीकर यांनी संपूर्ण वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रशांत ठाकरे यांनी केले. कार्यक्रमास पंढरपूर शहरातील डॉक्टर, वकील, शिक्षक, उद्योजक आणि वैचारिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रनिर्माणाच्या या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form