कर्मवीर औदुंबरराव पाटील विधी महाविद्यालय पंढरपूर येथे दीक्षांत समारंभ सोहळा संपन्न

पंढरपूर प्रतिनिधी -- कर्मवीर औदुंबरराव पाटील विधी महाविद्यालय, पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी महाविद्यालयाचा पहिला दीक्षांत समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण, दिमाखदार आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण ठरला असून विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अत्यंत अभिमानास्पद व अविस्मरणीय ठरला. या भव्य समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार, पंढरपूर सचिन लंगुटे यांची मान्यवर उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व गोल्ड मेडलिस्ट ॲड‌.वैशाली सोमासे (बॅच २०२३-२४) आणि ॲड. प्रार्थना शेटे (बॅच २०२४-२५) यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. याशिवाय शाहू शिक्षण संस्थेचे संचालक नारायण पाटोळे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनकांबळे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली, ज्यामुळे ज्ञानप्रकाशाचा संदेश सर्वत्र पसरला. त्यानंतर मान्यवरांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. या दीक्षांत समारंभात बी.ए. एल.एल.बी. बॅच २०२०-२१ व एल.एल.बी. बॅच २०२३-२४ या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान आणि अभिमान स्पष्टपणे झळकत होता. प्रमुख पाहुणे तहसीलदार, पंढरपूर सचिन लंगुटे यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतातून विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याचा आणि आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला. प्रमुख पाहुण्या ॲड.वैशाली सोमासे व ॲड.प्रार्थना शेटे यांनीही आपल्या अनुभवांच्या आधारे विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी मार्गदर्शन केले व प्रेरणा दिली. तसेच शाहू शिक्षण संस्थेचे संचालक नारायण पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनी पल्लवी कोरडे हिने आपले मनोगत व्यक्त करून शैक्षणिक प्रवासातील अनुभव आणि भावना प्रभावीपणे मांडल्या, ज्यामुळे वातावरण अधिक भावनिक आणि प्रेरणादायी झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील टीचिंग व नॉन-टीचिंग स्टाफ यांचे अनमोल सहकार्य लाभले. विशेषत ॲड. मुळे, ॲड.कडगे,ॲड. पुजारी, साठे ,खिलारे , झांबरे , हेगडे , डॉ. कुंभार मॅडम, ॲड. दुधाते व ॲड .सोनकांबळे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर या भव्य समारंभाचे आयोजन बी.ए. एल.एल.बी. फिफ्थ इयर व बी.ए. एल.एल.बी. थर्ड इयर या विद्यार्थ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध व उत्कृष्ट पद्धतीने केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे हा कार्यक्रम सुंदर, सुरेख आणि यशस्वीरीत्या पार पडला. महाविद्यालयाचा हा पहिला दीक्षांत समारंभ अत्यंत भव्य, सुंदर आणि प्रेरणादायी स्वरूपात पार पडला. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील नवीन पर्वाची सुरुवात घडवून आणली तसेच त्यांना आत्मविश्वास, प्रेरणा आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा दिली. हा दिवस सर्वांच्या स्मरणात कायम राहणारा ठरला.कार्यक्रमाचे आभार प्रवीण मुळे यांनी वक्त केले

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form