सुवर्णपदक विजेत्या पैलवान किशोर पवार याचा नागरी सत्कार
पंढरपूर प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्रीडा क्षेत्राबद्दल आपुलकी आहे, त्यामुळे
पैलवान किशोर पवार याला ते योग्य न्याय देतील, आणि माजी आ. प्रशांत परिचारक यांच्या
माध्यमातून आम्ही शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही युवा नेते प्रणव
परिचारक यांनी दिली. खेडभोसे गावचा सुपुत्र किशोर पवार याने ५७ किलो वजनी गटात फ्री
स्टाईल कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे, त्याबद्दल त्याचा
खेडभोसे ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री.
शाहू विजयी गंगावेश तालीमचे वस्ताद विश्वास हरगुले, युवा नेते प्रणव परिचारक, नूतन
पंचायत समिती सदस्या पूनम पवार, पै. प्रकाश बनकर, पै. प्रणित भोसले, प्रशिक्षक
उत्तम पाटील, भीमाप्पा माळी, पै. महेंद्र देवकते, पै. सुनील शेवतकर, पै. दादा
धोत्रे उपस्थित होते. उत्तम पाटील म्हणाले की, घरची आर्थिक परिस्थिती नसताना किशोर
याने देशासाठी पदक मिळवणे ही मोठी कौतुकाची बाब आहे. धनाजी मदने म्हणाले की, किशोर
याने मिळवलेले पदक हे देशासाठी अभिमानास्पद आहे. देशानेही किशोरच्या पाठीशी उभे
राहण्याची गरज आहे. पवार कुटुंबाने आपल्या पोटाला चिमटा काढून किशोर याला खुराक
पुरवला आहे, त्याचे चीज किशोर याने केले आहे. सत्काराला उत्तर देताना पै. किशोर
पवार म्हणाला की, आगामी महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेन आणि
सुवर्णपदकाची कमाई करीन, अशी मला अपेक्षा आहे. तुमचा असाच आशीर्वाद मिळावा. या
कार्यक्रमासाठी व्होळेचे सरपंच सुहास गुराडे, बाळासो पवार, अण्णासाहेब पाटील
(आजोती) यांच्यासह परिसरातील पैलवान, कुस्तीप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच सिद्धेश्वर पवार सहकार
शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना ली कामगार प्रतिनिधी बंडू पवार मा
उपसंरपंच पांडुरंग पवार यानी विचार व्यक्त केले यांनी केले. सूत्रसंचालन धनाजी मदने
यांनी केले. चौकट : खेडभोसे गावचे नाव देशात उज्ज्वल केल्याबद्दल या सुपुत्राचे
ग्रामस्थांनी फटाक्याच्या आतषबाजीत, सजवलेल्या बग्गीतून पै. किशोर याची सहकुटुंब
भव्य मिरवणूक काढली.
