भक्ती म्हणजे केवळ नामस्मरण नव्हे तर आपल्या कर्तव्यातच ईश्वराचा शोध घेणे म्हणजे
खरी भक्ती. पंढरीच्या विठू रायाचे निस्सीम भक्त असूनही आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक
राहून अध्यात्माची उंच शिखरे गाठणारे संत शिरोमणी म्हणजे, " संत नरहरी सोनार ".!
यांचा जीवन प्रवास म्हणजे भक्ती आणि कर्माचा सुंदर संगम आहे. 4 फेब्रुवारी 2026
रोजी त्यांचा 740 वा समाधी सोहळा आहे. त्यानिमित्ताने हा लेख.. भारतीय अध्यात्म
परंपरेत शैव आणि विष्णू हे दोन प्रवाह प्रदीर्घ काळापासून समांतर वहात होते. या दोन
उपासकामध्ये वादही होत. पण तेराव्या शतकात पंढरीच्या वाळवंटात अशा एका महान संतांचा
उदय झाला. ज्याने आपल्या कलेतून आणि भक्तीतून हे सिद्ध केले की, " हरि आणि हर " (
विष्णू आणि शिव ) यामध्ये कोणताही भेद नाही ते संत शिरोमणी नरहरी महाराज होय.
*कट्टर शिव भक्ती आणि विठ्ठल भेटीचा प्रसंग* -- पंढरपूरात राहूनही नरहरी महाराज
कधीही विठ्ठलाच्या मंदिरात जात नसत. ते अत्यंत कट्टर शिवभक्त होते. एकदा एका
सावकाराने विठ्ठलाला सोन्याचा कंबरपट्टा अर्पण करण्याचा नवस केला. त्याचे माप
घेण्यासाठी नरहरी महाराजांना विनंती केली. नरहरी महाराजांनी मंदिरात जाण्यास नकार
दिला. पण शेवटी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून ते मूर्तिचे माप घेण्यासाठी
मंदिरात गेले. *काय अजूबा झाला विठ्ठल* --- जेंव्हा महाराजांनी डोळ्यावर पट्टी
बांधलेल्या स्थितीत विठ्ठल मूर्तीला स्पर्श केला तेंव्हा त्यांना हाताला
व्याघ्रचर्म, गळ्यात सर्प आणि डोक्यावर जटांचा स्पर्श झाला. त्यांना वाटले ही तर
आपल्या शिवाचे रूप आहे. पण पट्टी काढून पाहिले तर समोर विठ्ठल उभा होता. पुन्हा
पट्टी बांधली की, पुन्हा शिवाचा भास ! या विलक्षण अनुभवातून त्यांना साक्षात्कार
झाला की, " शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, दोघेही एकाचे स्वरूप हाच तो "अजूबा "
होता. जिथे शिवात विठ्ठल आणि विठ्ठलात शिव एकरूप झाले होते. या घटने नंतर नरहरी
महाराजांनी भेदाची भिंत पाडली आणि ते वारकरी संप्रदायाचे अनन्य भक्त झाले. 4
फेब्रुवारी 2026 रोजी संत नरहरी महाराजांचा 740 वा समाधी सोहळा साजरा होत आहे.
त्यांनी पंढरपूर येथे शके 1235 ( इ. स. 1313 ) मध्ये समाधी घेतली. त्यांच्या
जीवनातून आपल्याला कांही महत्वाचे धडे मिळतात. 1 *अद्वैत विचार* -- देव एकच आहे,
फक्त त्याची रूपे भिन्न आहेत. 2 *कष्टातून भक्ती* -- देवा तुझा मी सोनार, तुझे नाम
आम्हां सार असे म्हणत त्यांनी आपल्या व्यवसायात विठ्ठल पाहिला. 3 *अहंकाराचा त्याग*
--- विठ्ठलाच्या भेटीने त्यांचा भेदांचा अहंकार नष्ट झाला. संत नरहरी महाराजांची ही
कथा केवळ एका चमत्काराची कथा नसून मानवी मनातून संकुचित विचार आणि वृत्ती नष्ट
करण्याची कथा आहे. आज 740 वर्षा नंतर ही, " हरि हर " ऐक्याचा संदेश तितकाच
प्रेरणादायी आहे. ' काय अजूबा झाला विठ्ठल ' हा अनुभव केवळ संत नरहरी महाराजांचा
नसून तो प्रत्येक भक्ताला एकात्मतेची शिकवण देणारा प्रकाश आहे. आज 4 फेब्रुवारी
2026 रोजी आपण आपल्या आराध्य दैवताचा , संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा 740 वा
समाधी सोहळा साजरा करत आहोत. देवा तुझा मी सोनार असे म्हणत व्यवसायालाच भक्ती
बनवणाऱ्या महाराजांचा वारसा आपण पुढे चालवत आहोत. या मंगल दिनी आपण समाजासाठी कांही
महत्वाचे संकल्प करू या.
1 *व्यवसायात सचोटी आणि कौशल्य* --- नरहरी महाराजांनी
सोन्याचे दागिने घडवताना त्यात कधीही खोटेपणा केला नाही. आजच्या काळातही सोनार
समाजाने आपल्या व्यवसायात शुद्धता आणि विश्वास हीच आपली खरी ओळख राखली पाहिजे.
तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन डिझाईन्स आणि आधुनिक कौशल्याची कास धरून आपला पिढीजात
व्यवसाय जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. 2 *हरिहर ऐक्याचा विचार*
--- संत नरहरी महाराजांनी शिव आणि विष्णू यांच्यातील भेद मिटविला याच न्यायाने
आपणही समाजातील पोटजाती, गट तट बाजूला सारून एकसंघ सोनार समाज म्हणून एकत्र येणे
काळाची गरज आहे. समाजात एकोपा असेल तरच आपण आपली प्रगती साधू शकतो. 3
*शिक्षणाद्वारे प्रगती* -- केवळ व्यवसायात अडकून न राहता समाजातील तरुण पिढीने उच्च
शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि उद्योग क्षेत्रात मोठी झेप घ्यावी. महाराजांची
बुद्धिमत्ता आणि कला जशी श्रेष्ठ होती तशीच प्रज्ञा आजच्या पिढीने ज्ञानाच्या
जोरावर सिद्ध करावी. 4 *सामाजिक बांधिलकी* --- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या
बांधवाना मदत करणे, समाजातील कर्तृत्वान आणि गुणी जनांचा, गुणवंत विध्यार्थ्यांचा
सन्मान करणे आणि एकमेकांच्या सुख दुःखात धावून जाणे हीच महाराजांची खरी सेवा ठरेल.
आपल्या कलेचा आणि संपत्तीचा कांही अंश समाजाच्या हितासाठी खर्च करण्याचा वसा आपण
घेतला पाहिजे. 5 *व्यसनमुक्ती आणि संस्कार* --- महाराजांचे जीवन अत्यंत सात्विक आणि
भक्तिमय होते. आजच्या तरुणाईला व्यसनापासून दूर ठेऊन त्यांना अध्यात्माची आणि
नीतिमत्तेची जोड देणे आवश्यक आहे . थोडक्यात संत नरहरी महाराजांचे 740 वे समाधी
वर्षं हे केवळ उत्सवाचे वर्षं नसून ते आत्मचिंतनाचे वर्षं आहे. आपण सारे केवळ
त्यांचे नांव सांगणारे न होता त्यांच्या सारखे शुद्ध आचरण करणारे व्हावे.
ज्याप्रमाणे अग्नीत तावून सु्लाखून निघाल्यावर सोन्याला चकाकी येते. तशाच कष्टाने
आणि प्रामाणिक पणाने आपण आपल्या समाजाची चकाकी जगभर पसरवू या. संत नरहरी महाराजांनी
जसा सोन्याला आकार देऊन सुंदर अलंकार घडवले. तसेच आजच्या युगात सोनार समाजातील
तरुणांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी *महाराष्ट्र शासनाने संत नरहरी महाराज
आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे*. 740 व्या समाधी सोहळ्याचे औचित्य साधून या
महामंडळाचा लाभ घेणे हीच खरी प्रगती आणि आर्थिक क्रांतीचे पाऊल ठरेल. या
महामंडळाच्या माध्यमातून समाजातील तरुणांना उद्योजकतेची संधी मिळेल . तसेच समाजातील
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पारंपारिक
सुवर्ण व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी किंवा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी हे
महामंडळ एक भक्कम आधार आहे. *कौशल्य विकास* -- केवळ कर्ज च नव्हे तर दागिन्याचे
डिझाईनिंग, मार्केटिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी महामंडळाने
पुढाकार घेतला पाहिजे. जेणेकरून आपला समाज जागतिक बाजार पेठेत स्पर्श करू शकेल.
*महिला सक्षमीकरण* -- समाजातील महिला बचत गटांना आणि महिला उद्योजकांना या
महामंडळाच्या योजनातून बळ मिळणे आवश्यक आहे. व्यवसायात महिलांचा सहभाग वाढल्यास
समाजाचा आर्थिक स्तर उंचावेल. *पारदर्शकता आणि जागृती* --समाधी सोहळ्यानिमित्त
प्रत्येक शहरात, तालुक्यात या महामंडळाच्या योजनान्ची माहिती पोहोचविणे गरजेचे आहे.
शासनाच्या या उपक्रमाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी संत
नरहरी महाराजांच्या नावाखाली चालणाऱ्या संस्था, मंडळे आणि संघटनानी, समाजातील नेते,
कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन पुढाकार घ्यावा. ज्याप्रमाणे संत नरहरी महाराजांनी
विठ्ठलाच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली त्याच प्रमाणे आपण आपली मेहनत आणि
शासनाच्या या योजनांची जोड देऊन समाजाला आर्थिक दृष्ट्या समृद्ध करू या ! संत नरहरी
महाराज आर्थिक विकास महामंडळ हे आपल्या प्रगतीचे एक महत्वाचे साधन आहे. त्याचा
सुज्ञ पणे वापर करणे हेच या समाधी सोहळ्याचे सार्थक ठरेल. *सोलापूर च्या सोनार समाज
संस्थेने आदर्श कृतीतून साकारली संत नरहरी महाराजांची सेवा* -- संत नरहरी
महाराजांचा 740 वा समाधी सोहळा आपण साजरा करत असताना केवळ उत्सव न करता समाजाच्या
उन्नतीसाठी, प्रगतीसाठी काय करावे याचा एक उत्तम वस्तूपाठ सोलापूरच्या सोनार समाज
संस्थेने घालून दिला आहे. 28 डिसेंबर 2025 रोजी सोलापूर येथे संपन्न झालेले, "
शासकीय योजना माहिती शिबीर " हे समाजाच्या आर्थिक क्रांतीचे पहिले पाऊल ठरले आहे.
या शिबिरात साधारणतः पाचसे समाज बांधवानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हे अत्यंत
आशादायी आहे.या शिबिराचे महत्व आणि फलश्रुती म्हणजे अधिकारी आणि सोनार, सुवर्णकार
बांधव यांचा थेट संवाद. या शिबिरात केवळ पत्रके वाटली नाहीत तर सर्व संबंधित
खात्याचे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या शिबिरात बहूआयामी योजनांची
माहिती दिली गेली, जसे की, *संत नरहरी आर्थिक विकास महामंडळ* --- समाजासाठी विशेष
असलेल्या या महामंडळा च्या कर्जाचा आणि इतर सवालतीच्या योजनांची सखोल माहिती
पोहोचवली गेली. *विश्वकर्मा कौशल्य विकास योजना* --- सोनार समाजाच्या पिढीजात
सुवर्ण कलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड कशी द्यावी याचे मार्गदर्शन यातून मिळाले.
*पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना* -- उद्योजक बनू इच्छिणाऱ्या
तरुणासाठी भाग भांडवल जसे उभे करावे यावर प्रकाश टाकला गेला. सोलापूर च्या या
उपक्रमाची सर्वत्र दखल घेऊन शासकीय योजना शिबिराचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
सोलापूर ने दाखवलेला हा मार्ग संपूर्ण राज्यासाठी दिपस्तंभ ठरत आहे. या कार्याची
दखल घेत दैनिक शिवनातीर चे संपादक श्री. मधुकर महाले ( छ. संभाजीनगर ), दैनिक लातूर
समाचार चे संपादक श्री. विवेकानंद जडे ( लातूर ), दैनिक शिव निर्णय चे संपादक श्री
अनील शिराळकर ( सोलापूर ), यांच्या सारख्या जेष्ठ संपादकांनी तसेच श्री. अजीत
पोतदार वशीकर मिरज, प्रकाश पोतदार सांगली, सुनील वेदपाठक, सुरेश पंडित कोल्हापूर,
भारत कारीकर सोलापूर , संजय आष्टीकर आष्टी, प्रमोद वेदपाठक माढा , सुभाषदादा
वेदपाठक मोडनिंब , यांचे सारखे उद्योजक आणि श्री. सुरेश महामुनी, प्रकाश तपासे,
सोलापूर, राजाभाऊ मैदर्गीकर, प्रमोद पाचणकर, सुभाष घोडके, पुणे, जगन्नाथ
धर्माधिकारी मसूर - कराड, शिवाजीराव महामुनी बीड, साहित्यिक कृष्णकांत लोणे
अहिल्यानगर, संजय शंकूरवार हदगांव नांदेड, डॉ. विनोद वेदपाठक अंबाजोगाई, डॉ.
ज्ञानेश्वर पंडित विजयपूर, यासारख्या समाज धुरीणांनी सोलापूर च्या उपक्रमाचा गौरव
केला आहे. तरी सर्व सोनार समाज बांधवाना आवाहन करण्यात येते की, सोलापूर मध्ये जो
उपक्रम राबवला गेला, तशाच स्वरूपाची शिबीरे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नरहरी
महाराजांचे नांवे असलेल्या संस्था नी आयोजित केली पाहिजेत. संत नरहरी महाराजांनी
जसे भक्ती आणि कर्माचा मेळ घातला, तसेच आपण भक्ती आणि शासकीय योजनांची माहिती यांचा
मेळ घालून समाजाची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे. ज्या समाज बांधवानी सोलापूर च्या
शिबिराचा लाभ घेतला त्यांनी आता या योजनेचे प्रत्येक्ष लाभ घेऊन आपल्या उद्योगाची
भरभराट करून स्वतःची प्रगती साधावी हीच संत नरहरी महाराजांच्या चरणी अर्पण केलेली
खरी कार्यांजली ठरेल. ----
वसंत पोतदार, सोलापूर --- मोबाईल 94230 65915

