कार्तिक यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी
पंढरपूर (दि.30):- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. पंढरपूरात येणाऱ्या वारकरी भाविकांना प्रशासनाकडून तसेच मंदीर समितीकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. यामध्ये दर्शनरांग, पत्राशेड, नदीपात्र वाळवंट, भक्ती सागर (65 एकर) येथे मोठ्या प्रमाणात भाविक असतात. यात्रा कालावधीत भाविकांचा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, कार्तिकी यात्रा कालावधीत शहरातील तसेच शहराबाहेरील खाद्य पदार्थ,प्रसाद, दुग्धजन्य पदार्थ विक्रीच्या दुकांनांची वेळोवळी तपासणी करावी. यासाठी जादा पथके नेमावित आवश्यकता भासल्यास इतर जिल्ह्यातून जादाचे कर्मचारी यांची उपलब्धता करावी. नगरपालिकेने शहरातील अनावश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर काढून टाकावेत. शहरातील रस्त्यावरील डिव्हायडर ची रंगरंगोटी करून घ्यावी. वारकरी भाविकांना रहदारीचा त्रास होणार नाही यासाठी नो हॉकर्स झोन येथे फिरते विक्रेते, हातगाडी यांच्यावर कारवाई करावी. शहरातील अति धोकादायक इमारतीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सूचना लावाव्यात. फिरत्या शौचालयाची संख्या वाढवावी. चंद्रभागा बस स्थानक येथे तात्पुरत्या शौचालयाची संख्या वाढवावी .आरोग्य विभागाने चंद्रभागा वाळवंट येथे दोन आय सी यु सेंटरची उभारणी करावी. यात्रा कालावधीत मांस, मटन, मच्छी मांसजन्य पदार्थाची विक्री होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधितावर कारवाई करावी.कृषी उत्पन्न बाजार समितीने जनावरांच्या बाजारात पशु व पशुपालकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी ज्यादा पथकांची नेमणूक करावी .
तसेच भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा देण्यासाठी १०८ च्या ॲम्बुलन्स संख्या तसेच आरोग्य दूतांची संख्या वाढवावी. पाटबंधारे विभागाने चंद्रभागा नदीपात्रात पाणी पातळी नियंत्रित राहील याची दक्षता घ्यावी .चंद्रभागा नदीपात्रात बोटीची संख्या वाढवावी तसेच बोटिंगची देखभाल दुरुस्तीसाठी पथक नेमावे नदीपात्रात आवश्यक ठिकाणी लाल झेंडे लावावेत. वाळवंटात चेंजिंग रूम ची संख्या वाढवावी. वीज वितरण विभागाने वारी कालावधीत अखंडित वीज पुरवठा सुरु राहील याची दक्षता घ्यावी.गॅस कंपनीने गॅस वितरणाच्या वेळी लहान गाड्यांचा वापर करावा तसेच त्यांच्याकडून सुरक्षिते बाबतचे प्रमाणपत्र घ्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.