पंढरपूर (प्रतिनिधी) :
पंढरपूर शहरातील नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करत सोमवारी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी, शहर पोलीस निरीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत रस्ते, नाले, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व वाहतूक या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. वारंवार लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मागण्या
📌 रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या :
शहरातील मुख्य रस्ते, उपनगरी मार्ग तसेच अंतर्गत गल्लीबोळात असंख्य खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे हे खड्डे तात्काळ आणि कायमस्वरूपी बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली.
📌 स्वच्छता मोहिमेची गरज :
शहरात नालेसफाई व रस्त्यांची स्वच्छता वेळेवर होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यांसारख्या आजारांचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे विशेष स्वच्छता मोहीम राबवून नियमित साफसफाई व्हावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
📌 कचरा व्यवस्थापन :
कचरा संकलन व विल्हेवाट यंत्रणा कार्यक्षम नसल्याने अनेक भागात कचऱ्याचे ढीग रस्त्यावर पडून राहतात. ही स्थिती तातडीने बदलून आधुनिक कचरा व्यवस्थापन पद्धती अमलात आणण्याची मागणी झाली.
📌 धार्मिक स्थळे व यात्रा मार्गांवरील स्वच्छता :
पंढरपूर हे धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्वाचे शहर असल्याने यात्राकाळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मात्र या ठिकाणी पुरेशा स्वच्छतेच्या उपाययोजना होत नाहीत. यात्रेकरूंना अडचणीतून मुक्त करण्यासाठी तातडीने स्वच्छतेसाठी विशेष पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
📌 नालेपाणी व घरांचे नुकसान :
ज्ञानेश्वर झोपडपट्टी, लक्ष्मी नगर, संत पेठ, अंबाबाई पटांगण, भगवान नगर, दाळे गल्ली या भागात नालेपाणी घरे व दुकानात घुसले आहे. या नागरिकांना त्वरित मदत व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
📌 जिजामाता शॉपिंग सेंटरमधील व्यापाऱ्यांचे नुकसान :
येथील गाळ्यांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करून व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी निवेदनात केली आहे.
📌 वाहतूक व बायपास रस्ते :
शहरातील वाहतुकीची कोंडी वाढत असून नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. शहर व ग्रामीण वाहतुकीसाठी योग्य नियोजन करून वाहतूक सुरळीत करावी तसेच प्रलंबित बायपास व इतर रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निवेदनात म्हटले आहे.
अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर हे निवेदन नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे, शहर पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत घोडके व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अमित निमकर पंढरपूरचे प्रांताधिकारी माननीय श्री सचिन इथापे यांनाही यावेळेस निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातील समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली.
उपस्थित मान्यवर
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष चे शहराध्यक्ष सुभाष दादा भोसले , मंगळवेढा चे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील ,आदित्य फत्तेपूरकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री अमर सूर्यवंशी, माऊली आबा काळे, अक्षय गंगेकर सुरेश नेहतराव, सतीश आप्पा शिंदे, दीपक वाडदेकर, नागेश गंगेकर, संदीप शिंदे सुमित ढेबे, श्याम गोगाव सर, अक्षय नवत्रे, गणेश माने, धनंजय मोरे, अनिताताई पवार, संगीताताई पाटील, अशाताई जमदाडे, गोकुळ धोत्रे, महेश अधटराव, किरणराज घाडगे, संतोष सर्वगोड, प्रशांत साळुंखे , अमोल अटकळे ,सोमनाथ भादुले , कार्तिक ढवळे, अक्षयकुमार बंदपट्टे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 या निवेदनाद्वारे पंढरपूर शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून लवकरच ठोस निर्णय होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे
Tags
सामाजिक वार्ता