पंढरपूर(प्रतिनिधी)--
समाजसेवा, माणुसकी आणि ऐक्याचे प्रतीक बनलेले पंढरपूर येथील युवा समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना यंदाचा प्रतिष्ठित राष्ट्रीय 'आयकाॅनिक अशोका अवॉर्ड' प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे आयोजित एका भव्य समारंभात, आयकाॅनिक पीस अवॉर्ड कौन्सिलच्या वतीने त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. देशातील केवळ एकाच व्यक्तीस दरवर्षी दिला जाणारा हा सन्मान, सामाजिक क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो.
"आयकाॅनिक अशोका अवॉर्ड" हा भारतातील आणि राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त पुरस्कार आहे. मौर्य सम्राट अशोक यांच्या विचारांप्रमाणे, सामाजिक परिवर्तनासाठी नावीन्यपूर्ण उपाय राबवणाऱ्या आणि प्रभावी नेतृत्व देणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जातो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, मानवी हक्क, आणि धर्मनिरपेक्षतेसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात परिवर्तन घडवणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुरस्काराने गौरवले जाते.
मुजम्मील कमलीवाले यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात त्यांच्या आईच्या आजारामुळे झालेल्या भावनिक धक्क्यानंतर केली. त्या अनुभवाने त्यांना समाजातील उपेक्षित घटकांप्रती संवेदनशील बनवलं. त्यांनी "आईसाठी… आणि आता साऱ्यांसाठी" या संकल्पनेतून हजारो भुकेल्यांना अन्नदान, वृद्धाश्रमातील सोडून दिलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आधार, आणि धार्मिक ऐक्याचे प्रतीक ठरतील असे उपक्रम सुरु केले.
ते केवळ अन्नदानापुरतेच मर्यादित न राहता, विविध धार्मिक स्थळांवर जात-धर्म न पाहता मदतीचा हात देतात. मुस्लिम असूनही त्यांनी हिंदू मंदिरांसमोर उपाशी बसणाऱ्या लोकांसाठी अन्नछत्र चालवले, वृद्ध मुस्लीम महिलांना शरण दिलं, आणि अनेक समाजघटकांमध्ये मैत्रीचा सेतू उभारला.
हा पुरस्कार केवळ एक मानचिन्ह नसून समाजसेवेच्या क्षेत्रातील प्रेरणास्त्रोत आहे. मुजम्मील कमलीवाले यांचा हा सन्मान नव्या पिढीला सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित करणारा ठरणार आहे.
Tags
सामाजिक वार्ता