भाळवणी प्रतिनिधी प्रशांत माळवदे --
पंढरपूर तालुक्यातील प्रवेशद्वार असलेल्या टप्पा (ता. पंढरपूर) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व सोपानकाका यांच्या बंधुभेटीचा सोहळा वैष्णवांच्या अक्षरशः भक्तीरसात न्हाऊन निघाला. हा अनोखा सोहळा पाहताना वैष्णवांना अश्रू अनावर होत होते. माऊली माऊलीचा जयघोष आणि टाळ मृदुगांच्या तालाने अनेकांचा कंठ दाटून आला होता. एकूणच भेट सोहळा भावविवश झाला होता. या बंधुभेटीचा अविस्मरणीय क्षण आपल्याला पहावयास मिळाल्याचा आनंद उपस्थित भक्तांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
पंढरपूर तालुक्यात ज्ञानोबा, तुकोबा पालखी सोहळ्यासह इतर संताचे पालखी सोहळे पंढरपूर तालुक्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे मार्गावर वैष्णवांची गर्दी दिसून येत असली तरी त्यात शिस्त असल्याने पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यास मदत होत आहे.
विठ्ठला भेटीची आस लागलेल्या लांखो वैष्णवांचा आनंदमेळा चैतन्यमयी वातावरणात पंढरपूर तालुक्यात आज दाखल झाला. सकाळी ९ वाजलेपासून प्रमुख पालख्मांसह संत गुलाबबाबा महाराज, संत गोविंद महाराज उपळेकर, संत निळोबाराम महाराज, संत गवरशेठ लिंगामत वाणी महाराज, चांगावटेश्वर पालखी सोहळ्मांनी पंढरपूर तालुक्मात प्रवेश केला. आबालवृध्द वारकरी, खांद्यावर भगवी पताका, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष, लाडक्या विठ्ठलाला अंभागातून दिलेली हाक, लयीत वाजणारे टाळ आणि विठुनामाचा गजर करित पालखी सोहळ्यातील एक एक दिंडी पुढे सरकत होती. एक एक दिंडी पुढे सरकत असताना बंधुभेटीचा सोहळा पाहण्यासाठी वैष्णव व परिसरातील ग्रामस्थांनी कडेला असलेल्या झाडाझुडपांच्या आश्रयाला गर्दी केली होती.
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी।
जन्मोजन्मी वारी घडली तया ।।
ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि भगव्या पताका उंचावत लांखो वैष्णवांची मंदियाळी पंढरपूर तालुक्यात दाखल झाली. टाळमृदुगांचा गजर आणि विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भक्तीरसात तल्लीन झालेल्या महिला-पुरूष वारकरी आनंदाने फुगड्या खेळत होते. वारकऱ्यांचे खेळ मोबाईल कॅमेरात टिपण्यासाठी तरूणांची धडपड सुरू होती. अशी सर्वांची लगबग सुरू असताना अचानक माऊली आणि सोपानकाका पालखी सोहळा सर्वाच्या नजरेमध्ये दिसला अन् सर्वं वैष्णवांचे बंधुभेटीसांक्ष कंठ दाटून आले. जसजसा दोन्ही पालखी सोहळा समीप येऊ लागला तसतसा संपूर्ण परिसर विठ्ठल नामाचा गजर अन् वैष्णवांच्या टाळ्याच्या कडकडाटाने भक्तीमय झाला. काहीजण देहभान, वय विसरून नाचणारे विठ्ठल नामाच्या गजरात दंग झाले होते. अखेर दुपारी 4 वाजता माऊली व सोपानकाका बंधुभेटीचा सोहळा वैष्णवांच्या भक्तीरसात न्हाऊन निघाला अन् उपस्थित असलेल्या लांखो वैष्णवांचे डोळे पाणावले. दोन्ही संस्थानांकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. या बंधुभेटीनंतर प्रथम सोपानकाका व नंतर ज्ञानेश्वर पालखी सोहळा भंडिशेगांव येथील मुक्कामी ठिकाणी मार्गस्थ झाला.
तद्अगोदर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दुपारी 3.30 वाजता पंढरपूर तालुका नगरीत दाखल झाला. तुकारामा तुकाराम नामाच्या जयघोषात व तोफांची सलामी देवून या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या स्वागतानंतर जगद्गुरू तुकार महाराज पालखी सोहळा पिराची कुरोली येथील पालखी तळ मुक्कामी मार्गस्थ झाला.
Tags
सामाजिक वार्ता