पंढरपूर शहरात व तालुक्याच्या परिसरात होर्डिंग /बॅनर्स / फ्लेक्स लावण्यास दि. १५ जुलै २०२५ पर्यंत प्रतिबंध...

पंढरपूर तालुक्यात येणाऱ्या सर्व मार्गावर व शहरात स्वागत मंडप, कमान घालण्यास प्रतिबंध 
 पंढरपूर दि.(20) :- 
आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच अन्य पालखी सोहळ्यासोबत  लाखो भाविक पंढरपूर येथे येतात. येणाऱ्या भाविकांची यात्रा सुलभ व सुरक्षितपणे पार पडावी यासाठी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर व शहराच्या हद्दीवर व शहरात स्वागत कमान घालण्यास स्वागत मंडप घालण्यास तसेच पंढरपूर शहरात व तालुक्याच्या परिसरात होर्डिंग /बॅनर्स / फ्लेक्स लावण्यास दि. १५  जुलै २०२५ पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. या बाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी पारीत केला आहे.

            माळशिरस तालुक्यातून पालखी सोहळे, पिराची कुरोली येथे बंधू भेट होऊन पुढे पंढरपूरकडे निघतात, त्यावेळी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी ठीकठिकाणी मंडप घातले जातात, स्वागत कमानी उभारल्या जातात, तसेच पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत फलक, फ्लेक्स व बॅनर लावले जातात. पालखी सोहळ्यासोबत लाखो भाविक पायी चालत पंढरपूर कडे येतात. विसाव्यासाठी तसेच न्याहारी व भोजनासाठी ते ठिकठिकाणी थांबतात. पालखी सोहळ्यासाठी स्वागत मंडप व स्वागत स्टेजमुळे सोहळयासोबत असणाऱ्या भाविकांना पुढे जाण्यास अडथळे निर्माण होतात. ठीक ठिकाणी स्वागतासाठी थांबलेल्या भाविकांमुळे पालखी सोहळ्यासोबत असणाऱ्या वारकऱ्यांना पुढे जाण्यास तसेच पालखी सोहळा वेळेत पुढील विसाव्यावर पोहचण्यास विलंब होतो, तसेच गर्दीचे व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.

           तसेच मार्गावर व रस्ता दुभाजकावर लावलेले फ्लेक्स व बॅनर मुळे भाविकांना रस्त्यावरील वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. तसेच होल्डिंग्ज व बॅनरची उंची जास्त असते. वादळी वाऱ्यामुळे किंवा वाहनांचा धक्का लागून ते कोसळू शकतात व त्यातून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकरिता, उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

                                      00000000

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form