दसरा सणानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सुवर्ण झळाली, झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट
पंढरपूर प्रतिनिधी--
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजया दशमीच्या (दसरा) निमित्ताने श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात झेंडू फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दसरा सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
दसरा अर्थात विजया दशमी. यानिमित्त लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरास आकर्षक फुलाने सजविले आहे. यासाठी सुमारे 1 टन झेंडू व आपट्याच्या पानाचा वापर केला असून, पुणे येथील दानशुर भाविक राम जांभूळकर यांनी सेवाभावी तत्वावर मोफत सजावट केली आहे. सोनेरी रंगाच्या या झेंडू फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे.
तसेच सकाळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते ध्वजपूजन होऊन नवीन ध्वज लावण्यात आला. संत नामदेव पायरी येथून सायंकाळी सवाद्य रथ मिरवणूक निघून रिध्दीसिध्दी गणपती मंदिराजवळ सिमोल्लंघन करून प्रदक्षिणा मार्गावरून संत नामदेव पायरी जवळ आली. त्यानंतर नगर प्रदक्षिणा मार्गाने पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसेच सणानिमित्त संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामधील भोजनप्रसादाचा गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता. त्याचा सुमारे 1500 भाविकांनी लाभ घेतला. तसेच दर्शनरांगेत पिण्याचे पाणी व चहा वाटप व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांना विठ्ठल रूक्मिणी मंदिरात व परिवार देवता मंदिरात आवश्यक व पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.
तसेच कै विलास रंगनाथ नलबिलवार यांचे स्मरणार्थ रविंद्र विलास नलबिलवार व रोहित विलास नलबिलवार राहणार पंढरपूर यांनी अन्नछत्रास सुमारे एक लाख किंमतीचे गहू, गुळ, शेंगदाणे, मसाला व इतर अनुषंगीक असे अन्नधान्य व किराणा माल देणगीरूपी उपलब्ध करून दिला आहे.
Tags
धार्मिक वार्ता