टेंभूच्या पाण्याने माण नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येणार - आमदार शहाजीबापू पाटील

माणगंगेच्या मदतीला कृष्णामाई धावली, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

सांगोला (तालुका रविराज शेटे)--
 टेंभू योजनेचे सध्या आवर्तन सुरू असून खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंभूच्या पाण्याने माण नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येणार आहेत. २५ जुलै पासून टेंभू योजनेचे पाणी बुद्धेहाळ तलावात सोडून पूर्ण क्षमतेने शंभर टक्के बुद्धेहाळ तलाव भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर टेंभूचे पाणी माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार आहेत. तसेच जुनोनी, हातीद, पाचेगाव, जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचे नियोजन केले आहे. टेंभू योजनेच्या रुपाने माणगंगेच्या मदतीला कृष्णामाईच धावून आल्याने सांगोल्यातील जनतेला, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. 
        यावर्षी टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन पहिल्यांदाच सांगोला तालुक्याला मिळाले. त्यावेळी माण नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरीत्या आवर्तन पूर्ण झाले होते. ऐन उन्हाळ्यात माण नदीला पाणी आल्याने शेतकरी सुखावला होता. सध्या टेंभूचे आवर्तन सुरू आहे. खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्याकडे केली आहे. 
        २५ जुलै पासून टेंभू योजनेचे पाणी बुद्धेहाळ 
तलावात सोडून पूर्ण क्षमतेने बुद्धेहाळ तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर टेंभूचे पाणी माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार आहेत. टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन मिळाल्यास जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. टेंभूचे पाणी माण नदीत सोडण्यात येणार असल्याने बलवडी, वझरे, नाझरे, चिणके, अनकढाळ, वाटंबरे, कमलापूर, वासुद, अकोला, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडे या गावांसह अन्य १५ ते २० गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच टेंभू योजनेच्या पाण्याने जुनोनी, हातीद, पाचेगाव, जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. टेंभूच्या आवर्तनाचे पाणी सर्व गावांना व्यवस्थित देऊन माण नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करून पाणी सोडण्याच्या सूचना टेंभूच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form