पंढरपूर प्रतिनिधी--
संपूर्ण देशभरात सरकारच्या वतीने लाखो बेघरांना आधार देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. सदर योजनेअंतर्गत पंढरपूर शहरात देखील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधण्यात आली आहेत. मात्र सध्या हा प्रकल्प अपुऱ्या अवस्थेत आहे तरी याबाबत संबंधित अधिकारी व सचिव यांची उपमुख्यमंत्री यांच्या दालनात बैठक आयोजित करून यातुन योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यानंतर तात्काळ उपमुख्यमंत्री अजितदादांनी याबाबत पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाचे अधिकारी व इतर संबंधितांची लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता संपताच बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रश्नात उपमुख्यमंत्री अजितदादांनी लक्ष्य घातल्यामुळे आता गोरगरीब नागरिकांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.
निवेदनात असे म्हटले आहे की, देशभरातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे मा.पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हस्ते दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी लोकार्पण सोहळा पार पडला. तेथील घरांच्या किंमती व पंढरपूर येथील घरांच्या किंमतीमध्ये खुप मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामुळे पंढरपूर येथील आवास योजनेसाठी ज्या लोकांनी पैसे भरले त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी घरे न घेता पैसे परत घेतले आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील घराची किंमत अंदाजे 3 लाख 71 हजार तर पंढरपूर येथील घराची किंमत ही 5 लाख 75 हजार इतकी आहे. तसेच त्यावर प्रचलित दराने बॅंकेचे व्याज आकारणी केल्यास सदर घरांची किंमत आणखीन जास्त होत आहे. सोलापूरच्या धर्तीवर पंढरपूर येथील आवास योजनेचे मुल्यनिर्धारण करून बेघरांना घरे दिल्यास सध्या बंद अवस्थेत असलेली योजना पूर्ण होवून अनेक बेघर असणाऱ्या गरिब बांधवांना घरे मिळतील. शासनाचा प्रकल्प पुर्ण होईल.
यापूर्वी राष्ट्रवादीच्या माध्यमातून पाठपुरावा करत जादा आकारण्यात येत असलेल्या रक्कमेचा मुद्दा उपस्थित करत नागरिकांना कमी किंमतीत घर मिळावे यासाठी सदरच्या प्रकल्पावर स्टे आणलेला होता नंतर तो उठविण्यात आला. परंतू अनेक सर्वसामान्य नागरिकांनी घर घेण्यासाठी बॅंक व इतर संस्थांकडून कर्ज घेवून त्याची रक्कम भरलेली आहे त्यांना हप्ते चालू आहे मात्र अद्याप ही घराचा ताबा मिळालेला नाही. याबाबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश देवून देखील त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. पंढरपूर नगरपरिषदेचे दोन अधिकारी बदलले मात्र सदरची योजना पुर्ण झाली नाही, नागरिकांना घराचा ताबा मिळाला आता प्रशासक तथा प्रांताधिकारी व मुख्यमंत्री यांनी सदरचे योजनेविषयी गांभीर्याने लक्ष देवून नागरिकांना लवकरात लवकर घराचा ताबा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीकांत शिंदे केले.
किंमत कमी करण्याची श्रीकांत शिंदे यांची मागणी
सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील घराची किंमत अंदाजे 3 लाख 71 हजार तर पंढरपूर येथील घराची किंमत ही 5 लाख 75 हजार इतकी आहे. तसेच त्यावर प्रचलित दराने बॅंकेचे व्याज आकारणी केल्यास सदर घरांची किंमत आणखीन जास्त होत आहे. त्यामुळे याची किंमत सोलापूरप्रमाणेच कमी करण्यात यावी अशी मागणी देखील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली आहे.
Tags
सामाजिक वार्ता