भाजपच्या फायद्यासाठीच सोलापुरात MIM मैदानात, उमेदवारीला विरोध करत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सोलापूर प्रतिनिधी --
सोलापूर लोकसभेची निवडणूक रंगतदार होताना दिसून येत आहे. सुरुवातीला युती आणि आघाडीच्या उमेदवारामध्ये ही मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट असतानाच एमआयएमकडून उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, केवळ भाजपलाच मदत व्हावी, यासाठी एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी आणि निरिक्षक अन्वर सादात यांनी सोलापुरातून उमेदवार देण्याचा घाट घातल्याचा आरोप एमआयएमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच, पक्षाच्या या भाजपधार्जीण भूमिकेला विरोध करत आपल्या पदाचे राजीनामे सादर केले आहेत. 

या पार्श्वभूमीवर बुधवारी एमआएमचे जनरल सेक्रेटरी कोमारोव्ह सय्यद, महिला अध्यक्ष रेश्मा मुल्ला, वाहतुक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद, दक्षिण सोलापूर अध्यक्ष तौसिफ़ काझी या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे जाहीर केले. शहरातील एमआयएम दरम्यान, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांचा या भूमिकेचा थेट फायदा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होणार असल्याची मत राजकीय जानकारांनी व्यक्त केले आहे.
 
शाब्दी आणि सादात हे मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा कुठल्याही प्रकारचा सांख्यिकी अभ्यास व मतदारसंघाची जात निहाय स्थितीचा अभ्यास न करता उमेदवारी जाहीर करत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी व एमआयएम पक्षाची आघाडी होती. या आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर होते, अशा नावाजलेल्या उमेदवारास 1 लाख 70  हजार मते पडली. त्या मत विभागणीचा फायदा भाजपला झालेला होता. तर काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी वंचित एमआयएम यांची आघाडी असताना तसेच तगडा उमेदवार असतानाही या मतदारसंघात यश आलेले नव्हते. त्यामुळे आजच्या परिस्थितीत जातीय समीकरण पाहता एमआयएम पक्षाचा उमेदवार म्हणजे भाजपच्या उमेदवाराला निवडणुकीत अप्रत्यक्षरीत्या मदत करण्यासारखे आहे, असा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये एमआयएमचे बूथ बूथनिहाय कार्यकर्ते नाहीत. कुठलीही निवडणूक यंत्रणेची तयारी नाही, याचा देखील त्यांनी विचार केला नाही. या सर्व परिस्थिती पाहता एमआयएमने उमेदवार या मतदारसंघात उभा करु नये अशी आमची भूमिका आहे. पण  एमआयएमचे निरीक्षक व जबाबदार पदाधिकारी सदर उमेदवारी जाहीर करण्याचे प्रयत्न करत आहेत. याचा आम्ही निषेध करत आहोत. आणि एमआयएम पक्षाचा राजीनामा देत आहोत. पुढील राजकीय भूमिका व वाटचाल कार्यकर्ते व मित्र वर्गासोबत चर्चा करून जाहीर करणार असल्याचे कोमारोव्ह सय्यद यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form