शिवरत्न वर 'तुतारी' ललकारणार...

   स्टेट्स निरोपाचा -
"तुम्ही या... आम्हाला बोलायचं आहे...!
तुमच्या सहमतीने निर्णय घेवुया..." त्यासाठीच भेटु. उद्या दि. १४/०४/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता.

अकलूज विशेष प्रतिनिधी ---
माढा मतदारसंघातील मातब्बर राजकीय घराणे म्हणजे मोहिते पाटील. सन 1999 च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्याबरोबर राहणाऱ्या या घराण्याने 2019 ला भाजप मध्ये पक्षप्रवेश केला होता. तब्बल पाच वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात मोहिते पाटील परिवार व कार्यकर्ते रविवारी दि.14 एप्रिल रोजी घरवापसी करणार आहेत.
    माढा लोकसभेच्या निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या मोहिते पाटलांची भूमिका काय असेल याची उत्सुकता गेली कित्येक दिवस संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला देखील लागून राहिली होती. गुरुवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची पुणे येथे भेट घेऊन अखेर ते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार यावर जणू शिक्केमोर्तबच केले.
   अकलूजचा 'शिवरत्न' बंगला हा संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे सत्ताकेंद्र होते. येथेच जिल्ह्याच्या अनेक राजकीय घडामोडी, चर्चा, खलबते,निर्णय झाले. याच शिवरत्नवर आज रविवारी मोहिते पाटील समर्थकांच्या उपस्थितीमध्ये मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. 'तुम्ही या... आम्हाला बोलायचं आहे...!
तुमच्या सहमतीने निर्णय घेवुया... त्यासाठीच भेटु. उद्या दि. १४/०४/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता.' असा मेसेज कार्यकर्त्यासाठी फिरू लागला आहे. मोहिते पाटील यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयासोबत त्यांचा कार्यकर्ता असतो. कार्यकर्त्यांना बरोबर घेऊनच शिवरत्न वर भविष्यातले प्रत्येक पाऊल टाकले जाते. याच कार्यकर्त्यांना उद्या शिवरत्न वर खास हाक दिली आहे. 2019 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश करताना देखील असाच जनसमुदाय शिवरत्नवर जमला होता. त्याही वेळेला समस्त कार्यकर्त्यांची इच्छा जाणून घेतली होती. त्यांचे मत विचारले होते. आणि लोक भावनेचा आदर करत त्या वेळेला भाजप या पक्षाचा विचार कार्यकर्त्यांनी मांडला होता. पाच वर्षात ज्या पद्धतीने भाजप या पक्षाने मोहिते पाटलांना वागणूक दिली. साहजिकच कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा उठाव करून मोहिते पाटलांनी भाजप पक्ष सोडावा यासाठीही गेली कित्येक दिवस आग्रह धरला आहे.
    भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट नाकारल्यानंतर मोहिते पाटील समर्थक आक्रमकपणे शिवरत्न वर घोषणा देत होते. मोहिते पाटील कुटुंबीयापाशी कार्यकर्ते गाऱ्हाणे मांडत होती. परंतु त्याही वेळेला त्यांच्या मनाचे समाधान होणारी गोष्ट घडली नव्हती किंवा भविष्यात काय होईल याची ठोस शाश्वती कोणीच दिली नव्हती. एका बाजूला मोहिते पाटील कुटुंबातील अनेक सदस्य गाव भेटी दौऱ्या दरम्यान लोकांशी संपर्क साधण्यात व्यस्त होते. तर कार्यकर्ते मात्र नेमका आपला नेता काय करणार? तुतारी घेणार का? भाजपातच राहणार का? बंड शमेल का? आमचं भैया खासदार होतील का? या एक ना अनेक प्रश्नांनी त्रासून गेले होते.
     यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उद्या सायंकाळी चार वाजता शिवरत्न वर कार्यकर्त्यांच्या बैठकीचा आयोजन करण्यात आलेला आहे. कार्यकर्त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे, भविष्यातील निर्णय हे त्यांच्या समवेत चर्चा करूनच या ठिकाणी घेतले जाणार आहेत.
       डिनर डिप्लोमसी - सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जेव्हा जेव्हा अनेक पेचप्रसंग निर्माण झाले, त्यावेळेला अकलूजच्या शिवरत्न वर जिल्ह्याची मातब्बर मंडळी एकत्रित जमायची. शिवरत्नवर स्नेहभोजन व्हायचे आणि अनेक प्रश्न निर्णय चुटकीसरशी सुटायचे. माढा सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन मातब्बर नेते 2004 नंतर पुन्हा एकदा अकलूजला एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे धुरंदर नेते उद्या शिवरत्न वर स्नेहभोजनासाठी एकत्र येणार आहेत.या ' डिनर डिप्लोमसी' मध्ये माढा, सोलापूरसह, बारामती लोकसभा मतदार संघाच्या राजकीय घडामोडींची चर्चा तर होणारच. परंतु या तिन्ही मतदारसंघाच्या राजकीय डावपेचांची गोळाबेरीज उद्या होण्याची शक्यता आहे.
  एकेकाळी या तिन्ही मतदारसंघांवर प्रभुत्व असणारी ही तीन नेतेमंडळी. काळाच्या ओघात आपापल्या मतदारसंघावरची पकड थोडीशी सैल झालेली. अशातच आपल्या पुढच्या पिढीसाठी या तिन्ही मातब्बर नेत्यांनी पुन्हा एकदा राजकारणाच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहे.
     
   स्टेट्स निरोपाचा -
"तुम्ही या... आम्हाला बोलायचं आहे...!
तुमच्या सहमतीने निर्णय घेवुया..." त्यासाठीच भेटु. उद्या दि. १४/०४/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता.
 हा मेसेज प्रत्येक कार्यकर्त्याच्या स्टेटसला दिसू लागला. जो तो कार्यकर्ता उद्या चार वाजता काय होणार यापेक्षा आपल्या मनातलंच होणार आहे. यासाठी प्रत्येकाला निरोप देऊ लागला आहे. उद्या यावं लागतंय, यायचंयच अशा पद्धतीने एकमेकांना निरोप धाडले जाऊ लागले आहेत. शनिवारी संध्याकाळपर्यंत शिवरत्नवर रविवारच्या बैठकीच्या आयोजनाची तयारी चालू होती. बैठक व्यवस्था, माईक व्यवस्था आणि संध्याकाळी उशिरापर्यंत चालणारी ही सभा यासाठी विजेचीही मोठ्या प्रमाणात सोय करण्यात आली आहे. उद्या माढा मतदार संघासह, संपूर्ण महाराष्ट्रातील मोहिते पाटलांना मानणारा कार्यकर्ता अकलूजला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form