पंढरपुरात निघाला अंगणवाडी सेविकांचा विराट मोर्चा... सेविकांचा प्रशासनाला गंभीर इशारा…


पंढरपूर प्रतिनिधी-- 
 गेल्या ३९ दिवसापासून म्हणजेच ४ डिसेंबर २०२३ पासून राज्यभरात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संप पुकारला आहे. या विविध मागण्यांसाठी गुरूवार दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी पंढरपूर शहर व तालुक्यातील तसेच मंगळवेढा आणि सांगोला येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पंचायत समिती पंढरपूर कार्यालयावर मोर्चा काढला.
सदर मोर्चाची सुरुवात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. पुढे स्टेशन रोड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा थेट पंचायत समितीवर धडकला.
यावेळी अंगणवाडी सेविकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात. चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. परंतु अधिकारी याकडे दुर्लक्ष करून उलट अंगणवाडी सेविकांना हजर राहण्यासाठी नोटिसा देत आहेत. या अन्याय करणाऱ्या नोटिसांची होळी करण्याचा इशारा. अंगणवाडी सेविका, मदतनीस संघटनेने दिला आहे. पंढरपूर तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये ‘मानधन नको वेतन हवे’, पेन्शन व ग्रॅज्युइटी मिळावी तुटपुंज्या मानधनात वाढ करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन पंचायत समिती कार्यालयाला समोर देण्यात आले.
यावेळी संघटनेच्या शहर अध्यक्षा आशा कांबळे, तालुकाध्यक्षा सुलभा कुलकर्णी, उपाध्यक्षा मंदाकिनी माने, सचिव प्रभावती कौलगे, सल्लागार सूमन राजपूत, आनंदी क्षीरसागर, आनंदी कुचेकर यांच्यासह हजारो अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता. या मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, कर्मचारी संघ शाखा पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form