एक मराठा, लाख मराठा….
पंढरपूर प्रतिनिधी----
मराठा आरक्षण कसे देता येईल याबाबत ठोस भुमिका व न्याय देण्याकरिता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवणे आवश्यक असुन समाजाला सरसकट आरक्षण देण्याबाबत तात्काळ विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी
आज आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेतील सहकारी नाशिक पुर्वचे आमदार राहुल ढिकले व नायगावचे आमदार राजेश पवार यांच्या
समवेत विधानसभा अध्यक्ष मा.श्री.राहुलजी नार्वेकर यांची मुंबई येथे भेट घेत विशेष
अधिवेशन बोलावण्याच्या मागणीचे निवेदन पत्र विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द केले व निर्माण झालेल्या परिस्थितचे गांभीर्य याची दखल घेण्याची सविस्तर चर्चा करत विनंती केली.
मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासुन पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सूरु केले आहे.यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी आंदोलने चालू असुन त्याची धग गावखेड्यासह शहरामध्ये दिसत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही व वैद्यकीय उपचारही घेणार नाही अशी कठोर भुमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे समाजात असंतोषाची भावना तीव्र झाली आहे, कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असुन मराठा तरुण आत्महत्येसारखे टोकाची पावले उचलताना दिसत आहेत.
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची आग्रही भूमिका आहे. यासोबतच धनगर समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज आहे असे मत यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त करत मतदारसंघातील तसेच राज्यातील समाजबांधवांच्या भावना अध्यक्षांपर्यंत पोहोचविल्या.
Tags
सामाजिक वार्ता