दर्शनरांगेत पाणी, विश्रांती कक्ष, शौचालय, चहा-खिचडी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध
दर 50 मीटर अंतरावर पर्यवेक्षकाची नियुक्ती. ---- *श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर
पंढरपूर (ता.20) :- सन 2023 यावर्षी कार्तिकी एकादशी गुरूवार, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 रोजी आहे. या यात्रेला अंदाजे 8 ते 10 लाख वारकरी भाविक येतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा – खिचडी वाटप करण्यात येत असल्याची माहिती सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविक आहेत, या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविणे आवश्यक आहे. त्यासाठी दर 50 मीटर अंतरावर अनुभवी पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून, काल दिनांक 19/11/2023 रोजी 29845 भाविकांनी पदस्पर्शदर्शन व सुमारे 15 हजार भाविकांनी मुखदर्शन घेतले आहे. त्यामध्ये दैनंदिन 24 तास मुखदर्शन व 22 तास पदस्पर्शदर्शन उपलब्ध आहे. तसेच या यात्रा कालावधीतील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत असून, श्रींचा पलंग काढणे, एकादशीच्या सर्व पुजा, महानैवेद्य, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला, प्रक्षाळपुजेचे योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.
याशिवाय, आपत्कालिन व सुरक्षा व्यवस्थेकामी ज्ञानदा फाऊंडेशन पुणे यांचे मार्फत प्रशिक्षण, सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचा-यासह, सिझफायर यंत्रणा, चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, सार्वजनिक प्रसारण सुचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलीसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच यावर्षी पोलिस विभागास मंदिर समितीच्या मार्फत अत्याधुनिक पद्धतीची सार्वजनिक सूचना प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती व ऑनलाईन देणगीसाठी QR CODE, सोने-चांदी वस्तु दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच मंदिर, श्री.संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप व श्री.संत तुकाराम भवन येथील स्वच्छता मंदिर कर्मचा-यांमार्फत व नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा इ. ठिकाणची स्वच्छता करण्यात येत आहेत. या कामी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येत असून, स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच मंदिर परिसरामध्ये दोन अद्ययावत रूग्णवाहिका वैद्यकीय पथकासह, प्रथमोपचार केंद्र व आसीयु, महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष, चेंजिंग रूम तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व त्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच यावर्षी प्रथमच 4 दिवस पत्राशेड 24 तास मोफत भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी 2000 अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक सेवा पार पाडत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली.
Tags
सामाजिक वार्ता