होटगी रोडवरील भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घराला अचानक मराठा बांधवांनी घेराव घातला
सोलापूर प्रतिनिधी ---
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावामध्ये मराठा बांधवांनी उपोषण सुरू केले आहे. रविवारी जरांगे पाटील यांची तब्येत अतिशय खालावली. त्यामुळे मराठा समाजातील बांधवांमधून तीव्र अशा भावना निर्माण झाल्या आहेत. मराठा समाज आता आपले आंदोलन आक्रमक करू लागला आहे. रविवारी रात्री होटगी रोडवरील भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घराला अचानक मराठा बांधवांनी घेराव घातला आणि घोषणाबाजी केली. ही माहिती मिळताच आमदार सुभाष देशमुख हे बाहेर आले आणि त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी देशमुख यांच्यासमोर आपल्या तीव्र भावना बोलून दाखवल्या. समाज बांधवांची आक्रमकता लक्षात घेऊन सुभाष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला परंतु त्यांचा फोन बिझी लागल्याने त्यांना त्यांच्या स्वीय सहाय्यकाशी बोलावे लागले. देशमुख यांनी समाज बांधवांचा आक्रोश फोनवर सांगितला. मी आपल्या सोबत आहे अशी ग्वाही दिली. यानंतर संतप्त झालेले मराठा बांधव तिथून निघाले.
Tags
आंदोलन वार्ता