पंढरपूर प्रतिनिधी --
राज्यातील साखर गाळप हंगाम कारखान्याचा लवकरच सुरू होणार आहे. साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा चारशे रुपये जादा दिले तरच कारखाने सुरू करू देणार आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
ऊस आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मंगळवारी राजू शेट्टी पंढरपूर येथे आले होते. त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या वर्षी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असताना साखर ३१०० रुपये क्विंटल होती. सध्या ३८०० रुपये क्विंटल दर सुरु आहे. साखरेची किंमत वाढली आहे. साखर कारखान्यांनी उतारा एक टक्का कमी दाखविला आहे. तसेच इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. यामुळे साखर कारखान्याला सरासरी एक हजार रुपयाचा फायदा झाला आहे. यामुळे साखर कारखान्यांनी शेतकन्यांना एफआरपी पेक्षा चारशे रुपये जादा द्यावेत. जर दिले नाही तर शेतकरी संघटने वतीने तीव्र आंदोलन करून गाळप हंगाम बंद पडण्यात येईल.
एफआरपीपेक्षा चारशे रुपये जादा द्यावेत, या मागणीसाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले आहे. यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, तानाजी बागल आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
Tags
राजकीय वार्ता