वारकरी संप्रदायाचे थोर रत्न किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

पंढरपूर प्रतिनिधी --
 प्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच आज निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

नेरुळ या त्यांच्या गावी त्यांच निधन झाले. गेल्या कांही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या २७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नेरुळ येथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच पार्थिव आज अंत्य दर्शनासाठी नेरुळ मधील विठ्ठल  मंदिरात ठेवण्यात येणार आहे. बाबा महाराज यांची प्रवचन- किर्तने राज्यातील गावा-गावा पर्यंत पोहचली होती. किर्तनकार म्हणून त्यांचा मोठा नावलौकीक होता.

बाबा महाराज सातारकर उर्फ 
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातार्‍यात झाला. पुढे त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे केली.
    त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले.
     आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
     १९५० ते १९५४ या काळात बाबा महाराज यांनी लाकूड सामानाचा म्हणजेच फर्निचरचा व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली.
     डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. भंडारा डोंगर, देहू , त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात.

💐बाबा महाराज सातारकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form