गणेशोत्सव शांतता, उत्साहात व पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा करा --उपविभागीय पोलीस अधिकारी-डॉ अर्जुन भोसले

पंढरपूर प्रतिनिधी:- आगामी गणेशोत्सव वअन्य सण-उत्सव साजरे करताना सर्व स्तरातील समाज घटकांनी सौहार्दपणे सहभागी होऊन शांतता व उत्साहाच्या वातावरणात तसेच पर्यावरणपूरक साजरा करावा,त्याच बरोबर समाजात सलोखा बंधुभाव वाढविण्यासाठी गणेश मंडळानी विशेष उपक्रम राबवावेत असे, आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी केले आहे.
        
 आगामी गणेशोत्सव व अन्य सण-उत्सवाबाबत पोलीस संकुल, पंढरपूर येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस तहसिलदार सुशिल बेल्हेकर,पोलीस निरिक्षक अरुण फुगे, मिलिंद पाटील,उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर, सहा.पोलीस निरिक्षक भुजबळ, पोलीस उपनिरिक्षक प्रशांत भागवत, महावितरणचे होनमाने तसेच गणेशत्सव मंडळाचे पदाधिकारी,पोलीस पाटील उपस्थित होते.
योवळी उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले म्हणाले, पंढरपूर तालुक्यात ४३४ गणेश मंडळे असून, पंढरपूर शहरात १४४तर ग्रामीण भागात २९० गणेश मंडळे आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यात सर्वच समाजाचे सण,उत्सव एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात व  जातीय सलोखा अबाधित ठेवतात अशी या तालुक्याची परंपरा आहे आणि हीच परंपरा  कायम ठेवून, गणेशोत्सव तसेच अन्य आगामी सण उत्सव साजरे करावेत. 
यंदाच्या वर्षी गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी साजरे होत आहे. परंतु श्री गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलाद मिरवणूक काढण्याबाबत पंढरपूर येथील मुस्लिम बांधवांनी सकारात्मकता दर्शवली आहे.तसेच गणेश मंडळानी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणीच गणेश विसर्जन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
पारंपरिक वाद्य व कमी आवाजाची सिस्टिम याला मंडळांनी प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांचा मंडप व विसर्जन मिरवणुकीतील देखावा हा रहदारीस अडथळा करणारा नसावा, ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा पाळावी, तसेच गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत.गणेशोत्सव तसेच अन्य सण-उत्सव साजरे करताना सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या आदेशांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देऊन उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी.गणेशोत्सव शांतता व सौहार्दाच्या वातावरणात पार पाडावा व त्यासाठी सर्व मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भोसले यांनी केले आहे.
संभाव्य दुष्काळी परिस्थीत लक्षात घेता गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव पारंपारिक व साधेपणाने साजरा करावा. मंडळांनी वर्गनी जमा करताना ऐच्छीक स्वरुपातच जमा करावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form