पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमे ।।
आषाढी कार्तिकी महापर्वे थोर । भजनाचा गजर करिती तेथे ।।
साधुसंत थोर पताकांचा भार । मुखी तो उच्चार नामामृत । ।
आनंदाचा काला गोपालकाला। हृदयी बिंगला नरहरी ।।
-संत नरहरी सोनार
आज वारकरी संप्रदायातील पंढरपूर निवासी थोर संत संत नरहरी महाराज सोनार यांची जयंती आहे. सबंध भारत वर्षातील शैव आणि वैष्णव हा भेद मिटवण्याचं काम प्राधान्याने संत नरहरी महाराज यांनी केलेलं आहे.
वास्तविक यांचे पूर्वज जरी बीड जिल्ह्यातील असले तरीसुद्धा संत नरहरी महाराज हे पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराच्या समोरच राहत होते.
एका नवस फेडणाराने पांडुरंग परमात्म्याच्या कमरेच्या कर्गोट्याचे माप घेण्यासाठी नरहरी महाराजांना विनंती केली त्यावेळेस संत नरहरी महाराजांनी पांडुरंगाचे कमरेचे करगोटा बनवण्याचे माप घेण्यासाठी मंदिरात गेले परंतु संत नरहरी महाराज हे शैव संप्रदायातील असल्यामुळे ते भगवान शंकरा शिवाय इतर कोणत्या देवतेचे तोंड बघत नव्हते. तरी परंतु पांडुरंग परमात्म्याच्या कमरेचे माप घेताना तो पांडुरंग नसून तो भगवान शंकरच आहे. तिथं त्यांना अभेदाचं दर्शन झालं ही त्यांच्या जीवनात घडलेली कथा सर्व परिचित आहे.
त्याच संत नरहरी महाराजांची आज जयंती.
खरंतर या अभंगात संत नरहरी महाराज म्हणतात, हे पंढरपूर ही नगरी श्रीहरीची आहे. इथं वारकरी नियमाने एकादशी व्रताला येतात. आषाढी कार्तिकी ही या पंढरपुरातली महापर्व आहेत. इथे भजनाचा गजर करतात. साधू संत पदाकांचे भार चालतात. मुखामध्ये राम कृष्ण हरीचा उच्चार करतात आणि यात्रा पूर्ण झाल्यानंतर गोपाळपुरामध्ये तसेच वाळवंटामध्ये गोपाळकाला केला जातो. हे सगळे आनंदाचं जे संस्कार आहेत तो संस्कार माझ्या हृदयात बिंबला. असं या अभंगांमध्ये संत नरहरी महाराज म्हणतात.
आज या जयंतीच्या निमित्ताने सर्व वारकरी बांधवांना अंतकरणपूर्वक शुभेच्छा.
ह. भ. प. सूर्याजी महाराज भोसले
संत साहित्य अभ्यासक, पंढरपूर
Tags
सामाजिक