काँग्रेसचा जनसंवाद रथ गावोगावी पोहोचणार -तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे
पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्यात काँग्रेसने गावोगावी जनसंवाद पदयात्रा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून काँग्रेसची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत.
भाजपाच्या एकूण सत्तेचा लेखाजोखा समाजापुढे मांडण्याचे धोरणही आखले गेले आहे. यादृष्टीने पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात ही
जनसंवाद पदयात्रा ४ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर यादरम्यान काढली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी दिली. ते पंढरपूर येथील काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बोलत होते.
जनसंवाद पदयात्रा राबवण्याच्या दृष्टीने पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीची बैठक बुधवारी घेण्यात आली. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, आ. प्रणिती शिंदे, जिल्हा अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात या जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी दिली. या बैठकीस ओबीसी काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस, किसान सेल, सेवादल, ग्राहक संरक्षण, महिला काँग्रेस सेल, माथाडी काँग्रेस सेल याशिवाय विविध सेलचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. येथील श्री संत गाडगेबाबा महाराज मठात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत, प्रारंभी श्री संत गाडगेबाबा महाराज, महात्मा गांधी, स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
राज्यात महागाईने उच्चांक गाठला आहे. महिला असुरक्षित आहेत. उद्योजक अस्थिर आहेत. या परिस्थितीत देशाला काँग्रेसच आधार देऊ शकते, हा विचार घेऊन काँग्रेस जनसंवाद पदयात्रा काढणार आहे, या पदयात्रेस तालुक्यातील अधिकाधिक काँग्रेस प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी व्यक्त केले. यावेळी
इतर पदाधिकाऱ्यांनीही बैठकीत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीनाथ बागल, सदस्य बजरंग बागल, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र उराडे, काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव शंकर सुरवसे, अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष अशपाक सय्यद, ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष
संग्राम जाधव, ओबीसी सेलचे माजी जिल्हा अध्यक्ष समीर कोळी, नागनाथ अधटराव, देवानंद इरकल यांच्यासह काँग्रेसच्या अनेक सेलचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
Tags
राजकीय