पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु
पंढरपूर,दि.03 (उमाका):-
गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपूरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या. मानाच्या पालख्याने श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरु केला.
पोर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झाले. गण गण गणात बोते आणि विठू नामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 4.30 वाजता गोपाळपूरात आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध सुमारे 350 संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या.
सकाळी 9.00 च्या सुमारास जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची तर 9.30 च्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या. या पालख्यासह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिड्यांचे गोपाळपुरात आगमन झाले.
तत्पुर्वी गोपाळपुर येथील श्रीकृष्ण मंदीरात पहाटे 3.00 वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर पहाटे 3.30 वाजता श्रीकृष्ण मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रध्देने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली. श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप करण्यात आले.
गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विलास मस्के, ग्रामसेविका ज्योती पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी पालख्यांचे व दिड्यांचे स्वागत केले. गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, हिरकणी कक्ष, प्लॅस्टिक संकलन केंद्र, तात्पुरते शौचालय, निवारा शेड आदी सुविधा वारकरी भाविकांसाठी उपलब्ध केल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या सोहळ्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.



