पंढरपूर --प्रतिनिधी
रंगपंचमी पंढरपूर येथे रविवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात रंगाची उधळण करीत अबालवृध्दांनी आनंद लुटला. दरम्यान परंपरे प्रमाणे श्री विठ्ठल व रूक्मिणीस दुपारी साडेचार वाजता पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला होता. यानंतर देवांच्या अंगावर केशर पाणी व गुलालाची उधळण करण्यात आली. रंगपंचमीची श्री विठ्ठल व रूक्मिणीची पाद्यपूजा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, सदस्या शकुंतला नडगिरे व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी एकत्रित केली. यानंतर मंदिर समितीच्या डफची मिरवणूक काढण्यात आली.
तसेच परंपरे प्रमाणे बडवे व उत्पात समाजाने देखील आपल्या डफा ची मिरवणूक काढली. यावेळी हलगीच्या नादावर उपस्थितांनी ठेका धरला होता. बडवे व उत्पात समाजाच्या डफा ची मिरवणूक दुपारी पाच वाजता मंदिर परिसरातील गल्ली बोळातून काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी रंग व पाणी उधळून याचे स्वागत केले. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने यंदा रंगपंचमी असून देखील भाविकांची मोठी गर्दी शहरात होती. या भाविकांनी देखील रंगाचा आनंद लुटला. डफा ची मिरवणूक संपल्यानंतर रंग खेळणे बंद केले जाते.
दरम्यान शहरातील विविध भागात देखील रंगपंचमी साजरी करण्यात आली.
येथील यमाई तलावाच्या ट्रॅकवर सकाळी सात वाजताच हजारो नागरिकांनी एकत्र येत रंगाची उधळण केली. विशेषतःपुरुषासह,युवा, युवती, बालगोपालास महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती

