विठ्ठलच्या हुरडा पार्टीत दिग्गजांची हजेरी


हुरड्यावर ताव अन राजकीय लगोरी
विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील यांनी विठ्ठल कारखान्यावर हुरडा पार्टी सुरू केली. स्वर्गीय वसंतराव काळे आणि कै. भारतनाना भालके यांनी ती प्रथा सक्षमपणे चालवली. विठ्ठलचे सध्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी या हुरडा पार्टीस विशाल रूप देऊन, राजकीय फायदा देणारी ठरवली आहे.
पंढरपूर---
 (स्पेशल न्यूजonly Avinash)पंढरपूरचे राजकीय आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या विठ्ठल कारखान्यावर हुरडा पार्टीने मोठी रंगत आणली आहे. पंढरपूर शहरासह तालुक्यातील दिग्गज राजकीय मंडळींनी या हुरडा पार्टीस हजेरी लावली असून, चेअरमन अभिजीत पाटील यांच्या समवेत उभ्या उभ्याच राजकीय चर्चेचा आस्वाद घेतला आहे. चार दिवसांच्या या हुरडा पार्टीत पुढील चार निवडणुकींची गणिते बांधली जात असून, विठ्ठल परिवारातील इतर नेतेमंडळी मात्र यापासून पूर्ण अनभिज्ञ आहेत.
    विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीपासून भलतेच चर्चेत आले आहेत. यामुळेच त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का देण्याचे काम आयकर विभागामार्फत करण्यात आले. काही महिन्यांपासून ते समाजापासून दूर असल्याच्या अफवा उडवण्यात विरोधकांनी धन्यता मानली होती. परंतु ११ जानेवारीपासून विठ्ठल कारखान्यावर सुरू झालेल्या हुरडा पार्टीने , सर्वच 
 मनसुब्यावर पाणी फिरवले आहे.

विठ्ठल कारखान्यावर दर दिवशीच सभासदांची लगबग, हुरडा पार्टीतील हुरडा, शेंगदाणे , गुळ, चटणी, मक्याचे शिजवलेले कणीस आणि त्यासोबत मठ्यावर ताव मारत आहेत.नागरिकांच्या जीवनातून बाहेर गेलेली हुरडा पार्टी, विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून सभासदांच्या पुन्हा जीवनात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बुधवारपासून सुरू झालेली ही हुरडा पार्टी दररोजच बहरत गेली. एकापाठोपाठ एक दिग्गज मंडळी या ठिकाणी हजर झाली. पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंढरपूर नगरपरिषद,या निवडणुकांमधील संभाव्य उमेदवारांनीही या हुरडा पार्टीस हजेरी लावली. हुरड्यावर ताव मारून अभिजीत पाटील यांच्याबरोबर राजकीय खलबते केली. विठ्ठलच्या सभासदांसाठी दरवर्षीच होणारा हा उपक्रम अभिजीत पाटील यांच्या नक्कीच पथ्यावर पडणारा ठरला. शनिवारी शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत ही हुरडा पार्टी सुरू होती. गरम गरम हुरड्याचा आस्वाद आणि सोबत राजकीय वातावरण गरम करणाऱ्या चर्चा, यामुळे ही हुरडा पार्टी नक्कीच पुढील निवडणुकांमध्ये धमाल घडवणार की काय ? अशी चर्चा राजकीय तज्ञ मंडळींमधून केली जात आहे


#चौकट#
विठ्ठलच्या हुरडा पार्टीत विठ्ठलचे सभासद, अभिजीत पाटील यांचे कार्यकर्ते, विठ्ठल परिवारातील संभाव्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार, याशिवाय पंढरपूर नगर परिषदेच्या संभाव्य उमेदवारांनीही हजेरी लावली . विठ्ठलच्या या हुरडा पार्टीचे गणित पुढील काळात, नक्कीच दिसून येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form