विठ्ठल रूक्मिणी मंदिर व समितीच्या अंतर्गत येणार्या परिवार देवतांची मंदिरे यांच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासनाने केले ७३ कोटी रूपये मंजूर --कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे
पंढरपूर- प्रतिनिधी
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी ७३ कोटी रूपयांचा आराखडा बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सदर कामाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीची बैठक नवीन भक्त निवास येथे पार पडली. यास मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शिवाजी महाराज मोरे, भास्करगिरी महाराज, ऍड.माधवी निगडे, डॉ.दिनेश कदम, संभाजी शिंदे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. तर सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व सदर आराखडा बनविणार्या आङ्गळे असोसिएटच्या तेजस्विनी आङ्गळे हे दोघे ऑनलाईन हजर होते.
बैठकी नंतर बोलताना ठोंबरे यांनी, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व समितीच्या अंतर्गत येणार्या २८ परिवार देवतांची मंदिरे यांच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासनाने ७३ कोटी रूपये मंजूर केले आहेत. यामध्ये मुख्यतः मंदिराचे अनेक वर्षे जतन व्हावे, संवर्धन करणे, मूळ स्वरूपात रचना करणे आदींचा समावेश आहे. त्यानुसार मंदिर समितीने एक आराखडा सादर केला होता. सदर आराखड्याचे मागील महिन्यात मुख्य सचिवांच्या समिती समोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी त्यांनी काही सूचना केल्या तसेच आज मंदिर समितीच्या बैठकीमध्ये देखील सदस्यांनी काही सूचना मांडल्या. या दोन्ही सूचनांचा एकत्रित आराखडा तयार करून यास मान्यता घेण्यात येणार आहे. दरम्यान श्री विठ्ठल व रूक्मिणी हे राज्याचे आराध्य दैवत असल्याने येथील कामाचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित केले जाणार आहे. राज्य शासनाच्या सूचने नुसार आषाढी पर्यंत सदर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे देखील ठोंबरे यांनी सांगितले.
आराखड्या नुसार मंदिरात करण्यात येणार बदल- राज्य शासनाच्या सूचने नुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर मूळ स्वरूपात भाविकांना दिसणे आवश्यक आहे. मंदिराचे जतन करताना पुढील शेकडो वर्षे यास धक्का लागणार नाही त्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी काळा व तांबडा दगड वापरून आकर्षक पध्दतीने काम केले जाणार आहे. पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना मूळ मंदिर पहावयास मिळत नाही. यासाठी सभामंडपातील डावीकडील कार्यालये काढून येथूनच दर्शन रांग सुरू करण्यात येणार आहे. देवाच्या गाभार्यातील मार्बल काढून टाकले जाणार आहे. मंदिरातील जुन्या वीजेच्या वायरी काढणे, पावसाळ्यात पाणी गळणे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. फरशी काढून या ठिकाणी दगडाची फरशी व आवश्यक तेथे दगड व लाकडाचे काम केले जाणार आहे. भाविकांसाठी आवश्यक ठिकाणी छत उभारले जाणार आहे.
दरम्यान मंदिर समितीची आज पाच तास बैठक सुरू होती. यामध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. मंदिराचा आराखडा पडद्यावर सादर करण्यात आला. यावेळी सदस्यांनी यामध्ये काही सूचना देखील केल्या. तसेच बैठकीमध्ये मंदिराचे अस्थापन या विषयावर जोरदार चर्चा झाली.